गरबा, दांडियालाही परवानगी नाहीच; नवरात्रौत्सवासाठी नियमावली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2020 06:56 IST2020-10-10T02:12:29+5:302020-10-10T06:56:21+5:30
गर्दी टाळण्यासाठी देवीच्या दर्शनाची ऑनलाइन व्यवस्था करण्याची सूचना

गरबा, दांडियालाही परवानगी नाहीच; नवरात्रौत्सवासाठी नियमावली
मुंबई : यंदा दांडिया रंगणार नाही. सार्वजनिक मंडळांसाठी महापालिकेने नियमावली तयार केली आहे. त्यानुसार गर्दी टाळण्यासाठी देवीच्या दर्शनाची ऑनलाइन व्यवस्था करण्याची सूचना करण्यात आली आहे. तसेच सोशल डिस्टन्स पाळणे, मास्कचा वापर आणि नियमित निर्जंतुकीकरण बंधनकारक करण्यात आले आहे.
गणेशोत्सवानंतर म्हणजेच १ सप्टेंबरपासून मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढत गेली. त्यातच १७ ऑक्टोबरपासून नवरात्रौत्सव सुरू होणार असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका आहे. हा धोका टाळण्यासाठी महापालिकेने तयार केलेल्या नियमावलीनुसार देवीची घरगुती मूर्ती दोन फूट तर सार्वजनिक मंडळांची मूर्ती चार फूटच ठेवावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
सार्वजनिक मंडप उभारण्यासाठी ३० सप्टेंबरपासून परवानगी देण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये गतवर्षी परवानगी घेतलेल्या मूर्तिकारांना यंदा स्थानिक पोलीस, वाहतूक पोलीस यांची परवानगी घ्यावी लागणार नाही. मात्र नवीन मूर्तिकारांना ही परवानगी घेणे बंधनकारक असेल.
तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम पाळणार असल्याचे हमीपत्र द्यावे लागणार आहे. पारंपरिक मूर्तिकारांना परवानगी देण्यात येत असून, अन्यत्र तयार केलेल्या मूर्ती विक्रीसाठी मंडप उभारण्याची परवानगी देण्यात येणार नाही.
असे आहेत नियम
या वर्षी गरबा, दांडिया, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी नाही. तसेच सार्वजनिक मंडळांना देवीच्या आॅनलाइन दर्शनाची व्यवस्था करावी लागेल.
देवीच्या आगमन, विसर्जन मिरवणुकीवर बंदी आहे.
‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेची जनजागृती, ‘आरोग्य’विषयक उपक्रमांचे आयोजन करावे.
मंडपात थर्मल स्क्रीनिंग, निर्जंतुकीकरणाची व्यवस्था असावी. तसेच मंडपात एकावेळी पाचपेक्षा अधिक कार्यकर्ते नसावेत.