Join us

मोठा-छोटा कोणी नाही, आम्ही जुळे भाऊ; जागा वाटपावर संजय राऊतांचा भाजपाला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2019 09:01 IST

शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी जागावाटपावरही भाष्य केले आहे.

मुंबई : शिवसेनेचे युवा प्रमुख आदित्य ठाकरे यांनी जनआशिर्वाद यात्रा सुरू केली, त्यावरून त्यांना लोकांपर्य़ंत पोहोचायचे आहे. आदित्य यांना मी लहानपासून ओळखतो. वयात फरक असला तरीही आम्ही चर्चा करतो. लोकांना समजून घेण्याची त्यांची शक्ती मोठी आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले. 

एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी जागावाटपावरही भाष्य केले आहे. विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. यामुळे बरेचजण जागावाटपावर त्यांची मते मांडत आहेत. मुख्यमंत्री पदाची इच्छा एखाद्याने व्यक्त केली त्यात गैर काय. केंद्रात मोदी सरकार आहे. यामुळे महाराष्ट्रात आम्ही शिवसेनेचा मुख्यमंत्री हवा अशी इच्छा व्यक्त केली आहे, असे राऊत म्हणाले. 

तसेच राज्यातील भाजपाचे नेते, प्रभारी भाजपा जास्त जागा लढविणार असल्याचे म्हणत आहेत, याकडे लक्ष वेधले असता राऊत यांनी यावर भाजपाचे कान टोचले आहेत. शिवसेनाप्रमुखांनी नेता बनून पक्ष वाढविण्याचा निर्णय घेतला होता. तो गेल्या 50 वर्षांपासून फोकसमध्ये होते. बदलत्या काळानुसार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदी बसण्याचा निर्णय घेतला असेल तर चुकीचे नाही. केंद्रात मोदींची सत्ता आमच्या मदतीनेच आली आहे. आम्ही जुळे भाऊ आहोत. मोठा-छोटा ही राजकीय व्याख्या राजकारणात बदलावी लागते, असे सांगत जागावाटपावर समसमानच जागा मिळतील असा संदेश राऊत यांनी दिला आहे. 

तसेच मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस आणि अमित शहा हे बोलतील तेच आम्ही ग्राह्य धरू, अन्य कोणी काय बोलते ते त्यांचे मत असते. यामुळे विधानसभा युतीमध्येच लढविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :शिवसेनाआदित्य ठाकरेसंजय राऊतभाजपाविधानसभा