"... यापुढे महात्मा जोतिबा अन् सावित्रीमाईंच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करू नका"; आव्हाड संतापले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2024 09:07 AM2024-03-21T09:07:36+5:302024-03-21T09:09:40+5:30

रुपाली चाकणकर यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या महिला मेळाव्यात बोलताना सुप्रिया सुळेंचं नाव न घेता त्यांच्यावर बोचरी टीका केली

"... no more garlanding the images of Mahatma Jotiba and Savitrimai.", Jitendra awhad on rupali chakankar | "... यापुढे महात्मा जोतिबा अन् सावित्रीमाईंच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करू नका"; आव्हाड संतापले

"... यापुढे महात्मा जोतिबा अन् सावित्रीमाईंच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करू नका"; आव्हाड संतापले

मुंबई - लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप आणि एकमेकांवर टीका करण्याची स्पर्धाच लागली आहे. त्यातच, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर दोन गटात नेते व पदाधिकाऱ्यांची विभागणी झाली आहे. त्यात, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांना देण्यात आली आहे. त्यानंतर, त्यांनी थेट खासदार सुप्रिया सुळेंना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. नुकतेच एका कार्यक्रमात चाकणकर यांनी केलेल्या टीकेवरुन आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे.  

रुपाली चाकणकर यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या महिला मेळाव्यात बोलताना सुप्रिया सुळेंचं नाव न घेता त्यांच्यावर बोचरी टीका केली. लग्नानंतर मुलीने सासरी लुडबूड करायची नसते, माहेरी किती लुडबूड करावी यालाही मर्यादा असतात, असे म्हणत सुप्रिया सुळेंवर टीका केली होती. चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्षा असतानाही महिलेचा सासरी आणि माहेरी असलेल्या अधिकारावरच त्यांनी अप्रत्यक्षपणे भाष्य केलं आहे. त्यामुळे, त्यांच्या या विधानावरुन त्यांना टीकेचा सामना करावा लागत आहे. आता, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे. 

महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांनी सुप्रियाताईंबद्दल बोलताना, "माहेरी किती लुडबूड करावी, यालादेखील मर्यादा असतात" , असे म्हणत तमाम स्त्री वर्गाचा अपमान केला आहे. आजच्या काळात स्री-पुरुषांमध्ये भेद राहिलेतच कुठे अन् हे भेद नष्ट व्हावेत, यासाठी तर लढाई सुरू असते. आदरणीय शरद पवार यांनी महिलांना दिलेले ५० टक्क्यांचे आरक्षण कशासाठी होते? राजकारणात मिळालेली संधी कशासाठी होती? याचे उत्तर आहे की, महिलाही पुरूषांइतक्याच कर्तबगार असतात आणि त्यांची कर्तबगारी सिद्ध करता यावी, या भावना आदरणीय शरद पवारसाहेब यांच्या होत्या आणि आहेत. त्याच शरद पवार साहेब यांच्या मदतीसाठी त्यांच्या अस्तित्वाच्या लढ्यासाठी जर सुप्रियाताई लढत असतील, संघर्ष करीत असतील तर त्यास 'लुडबूड' म्हणून संबोधल्याने रूपालीताई चाकणकर यांच्या बुद्धीचीच किव येते, असे म्हणत आव्हाड यांनी चाकणकर यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

सावित्रीमाईंना पुष्पहार अर्पण करू नका 

एखाद्या मुलीला ती केवळ मुलगी आहे अन् ती सासरी गेली आहे, म्हणून तिचा माहेरचा अधिकार नाकारणे, हा प्रकार राजर्षी शाहू महाराज आणि क्रांतीबा जोतिराव फुले- सावित्रीमाई फुले यांच्या विचारांचा अपमानच आहे. त्यामुळे जर आपले असे विचार असतील तर यापुढे किमान महात्मा जोतिबा आणि सावित्रीमाई यांच्या प्रतिमांना पुष्पहार तरी अर्पण करू नका. जर हजारो वर्षांपूर्वीचे हे जुनाट विचार तुमचे असतील आणि स्री - पुरूष भेदभाव तुम्ही आजही मानत असाल तर तुमची किवच करावीशी वाटते. 

सासर-माहेर ह्या कल्पना इतिहासजमा

केवळ ती मुलगी आहे, म्हणून तिचे अधिकार नाकारणाऱ्या जमान्यातील तुम्ही आहात. पण, आमच्यासारखे वंशाला दिवा आहे किंवा नाही, असा विचार न करता, एका मुलीवरच समाधान मानून तिलाच सर्व अधिकार देणारे आहोत, याचा आम्हाला अभिमान आहे, आणि हो, जेवढं कौतूक आईपुढे ढाल म्हणून उभे राहणाऱ्या राहुल यांचे केले जाते; तेवढेच कौतुक आम्हा सर्वांना सुप्रियाताईंविषयी आहे. ज्या मुलीच्या बापाने आपुलकीने ज्या स्वकियांना आणि परकियांना मोठे केले आणि ज्यांना मोठे केले; त्यांच्याकडूनच 'तिच्या' पित्याला घाव सोसावे लागत आहेत. अशा वादळात... रणसंग्रामातही सुप्रियाताई समर्थपणे खडकाप्रमाणे उभ्या राहून संघर्ष करीत आहेत. ही जिजाऊंची लेक आहे, ही अबला नारी नाही. सासर आणि माहेर या कल्पना आता इतिहासजमा झाल्या आहेत. दुर्दैवाने आपण ज्या आयोगाच्या अध्यक्षा आहात. त्या आयोगाच्या प्रमुख असतानाही आपण अशा भेदभावाच्या भावना बाळगत असाल तर स्री अत्याचाराविषयी आपल्या काय भावना असतील, याचा विचारच न केलेला बरा, अशा शब्दात आव्हाड यांनी रुपाली चाकणकर यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे.  
 

Web Title: "... no more garlanding the images of Mahatma Jotiba and Savitrimai.", Jitendra awhad on rupali chakankar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.