जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 06:56 IST2025-05-05T06:56:14+5:302025-05-05T06:56:26+5:30

बांधकामाच्या दिरंगाईबद्दल कंत्राटदाराला तंबी, ऑक्टोबरपर्यंत दोन विंगचे काम पूर्ण करण्याची सूचना 

No more 'date by date' regarding J. J. Super Specialty Hospital! | जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 

जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 

संतोष आंधळे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जे. जे. रुग्णालयाच्या बहुचर्चित सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे बांधकाम गेल्या काही वर्षांपासून लांबणीवर पडत आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये या रुग्णालयाच्या दोन विंगचे काम पूर्ण होणार होते. मात्र, तांत्रिक कारणामुळे ते झाले नाही. आता ते ऑक्टोबरमध्ये पूर्ण करण्याचे आदेश कंत्राटदाराला देण्यात आले आहेत. रुग्णालयाचे संपूर्ण काम पूर्ण करून उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित केले जाणार असल्याचे समजते.

या रुग्णालयाला १८० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे उद्घाटन करण्याचा वैद्यकीय शिक्षण विभागाचा प्रयत्न आहे. सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यासाठी ७०० कोटींचे कंत्राट देण्यात आले आहे. २०२० मध्ये सुरू झालेले बांधकाम ३६ महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित होते. 

मार्च २०२४ मध्ये वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आढावा बैठक घेतली होती. त्यात कंत्राटदाराने ए, बी, सी आणि डी या विभागांपैकी पहिल्या दोन विभागांचे काम जुलैमध्ये पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र ते पूर्ण झाले नाही. त्यानंतर दिलेली ऑक्टोबर २०२४ ची डेडलाइन उलटूनही बांधकाम पूर्ण झाले नाही. आता ते पूर्ण करण्यास ऑक्टोबर २०२५ची मुदत दिली आहे. रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी कंत्राटदाराला आणखी किती मुदत देणार, अशी चर्चा डॉक्टरांमध्ये आहे.

‘तांत्रिक बाबीमुळे विलंब’
सुपर स्पेशालिटीच्या बांधकामाचा दर महिन्याला आढावा घेत आहोत. तांत्रिक बाबींमुळे कामाला उशीर झाल्याचे कंत्राटदाराने सांगितले. पहिल्या दोन विंगचे काम ऑक्टोबर अखेरीस पूर्ण करण्याचे निर्देश कंत्राटदारास दिले आहेत. कंत्राटदाराला यापुढे मुदतवाढ मिळणार नाही, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. या रुग्णालयाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्याचा विचार असल्याचेही ते म्हणाले.

असे असेल सुपर स्पेशालिटी जे. जे. 
दुमजली तळघरासह तळमजला अधिक १० मजली इमारत. प्रत्येक मजला एक लाख चौरस फुटांचा.
रुग्णालय इमारतीत हृदयशस्त्रक्रिया, न्युरो सर्जरी, हेमॅटॉलॉजी, रुमॅटॉलॉजी, किडनी विकार, एंडोक्रायनोलॉजी, कॅन्सर शस्त्रक्रिया, गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी विभाग, अत्याधुनिक व्हीआयपी वॉर्ड, वैद्यकीय विभागात अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर कॉम्प्लेक्स, वॉर्ड.
सध्या जे. जे. रुग्णालयाची 
१,३५० खाटांची क्षमता. सुपर स्पेशालिटी रुग्णालयात आणखी एक हजार खाटा वाढतील आणि खाटांची संख्या २,३५० होईल.

Web Title: No more 'date by date' regarding J. J. Super Specialty Hospital!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.