विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय परीक्षा नको;अमित देशमुख यांच्या कुलगुरूंना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2020 01:36 IST2020-07-24T01:36:31+5:302020-07-24T01:36:37+5:30

राज्यातील इतर विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय राज्य सरकारने यापूर्वीच घेतला आहे.

No medical examination endangering the lives of students; Notice to Amit Deshmukh's Vice Chancellor | विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय परीक्षा नको;अमित देशमुख यांच्या कुलगुरूंना सूचना

विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय परीक्षा नको;अमित देशमुख यांच्या कुलगुरूंना सूचना

मुंबई : राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याबाबत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. मात्र, सध्याची परिस्थिती लक्षात घेता विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय परीक्षा न घेता अनुकूल वातावरण निर्माण होताच त्या घेण्यात याव्यात, अशा सूचना वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांना दिल्या आहेत.

राज्यातील इतर विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय राज्य सरकारने यापूर्वीच घेतला आहे. त्यामुळे वैद्यकीय विद्यापीठांच्या अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाला बाधा निर्माण होणार नाही यादृष्टीने या विद्यार्थ्यांची इंटर्नशिप सुरू करण्यात यावी. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात याव्यात, तसेच प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षांतील विद्यार्थ्यांच्या पुढील वर्षाचा अभ्यासक्रम सुरू करण्यात यावा आणि सर्व नॉन सर्टिफाइंग परीक्षा पुढील सूचनेपर्यंत पुढे ढकलण्यात याव्यात, असे देशमुख यांनी कुलगुरूंना सांगितले आहे.

पदव्युत्तरची परीक्षा वेळापत्रकानुसारच

पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी सध्या कॅम्पसमध्येच असल्यामुळे याबाबत फारशी अडचण येणार नाही. या विद्यार्थ्यांच्या प्रवेश परीक्षा १५ सप्टेंबर रोजी ठरल्यानुसार वेळेवर घेण्यात याव्यात. मात्र, कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे ऐनवेळी अडचण निर्माण झाल्यास परिस्थिती पाहून याबाबत निर्णय घेण्यात यावा, अशा सूचनाही देशमुख यांनी कुलगुरूंना दिल्या आहेत.

Web Title: No medical examination endangering the lives of students; Notice to Amit Deshmukh's Vice Chancellor