कुलाबा प्रकरणात अधिकाऱ्याची चूक दिसत नाही; निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 06:47 IST2026-01-14T06:47:37+5:302026-01-14T06:47:57+5:30
या प्रकरणात महापालिका आयुक्तांकडून अहवाल मागवला होता.

कुलाबा प्रकरणात अधिकाऱ्याची चूक दिसत नाही; निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांचे स्पष्टीकरण
मुंबई: कुलाबा येथे विरोधी पक्षांच्या उमेदवारांना अर्ज भरू न दिल्याच्या प्रकरणात निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची चूक दिसून येत नाही, असे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
कुलाबा येथे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधी पक्षांच्या उमेदवारांना अर्ज भरू दिले नाहीत, असा आरोप करण्यात आला होता. त्याबाबतचा एक व्हिडीओही समोर आला होता. या प्रकरणात महापालिका आयुक्तांकडून अहवाल मागवला होता. व्हिडीओ फुटेजही बघितले.
पाच वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्यासाठी वेळ होता. पाचच्या आधी अधिकाऱ्यांनी दहा मिनिटे दोन ते तीन वेळा अर्ज भरण्यासाठी पुकारा केला होता असे दिसून आले, असे वाघमारे म्हणाले.
प्राथमिकदृष्ट्या निवडणूक निर्णय अधिकारी यांची चूक दिसून येत नाही. अतिरिक्त फुटेज आम्ही मागितले आहे, असेही वाघमारे यांनी सांगितले.
केडीएमसीचा अहवाल मागवला
कल्याण-डोंबिवली महापालिका प्रभाग क्रमांक २९ मध्ये पैसे वाटतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्तांकडून अहवाल मागविण्यात आला असल्याचे ते म्हणाले.
'बिनविरोध' बाबतही अहवाल
बिनविरोध निवड झाली आहे त्या ठिकाणी महापालिका आयुक्तांकडून अहवाल मागविला आहे. जो उमेदवार बिनवरोध झाला आहे त्याने इतर उमेदवारांवर काही दबाव आणला का, माघार घेतलेल्या उमेदवारांना काही आमिष दाखविण्यात आले का, पोलिस तक्रार आहे का किंवा इतर काही तक्रार आहे का या चार प्रमुख बाबींचे स्पष्टीकरण या अहवालात असेल, असे ते म्हणाले.