रस्ते काँक्रिटीकरण कामांना मुदतवाढ नाही; महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 13:21 IST2026-04-08T13:21:13+5:302026-04-08T13:21:46+5:30
सध्याच्या कामांसाठी ३१ मेची डेडलाइन जारी

रस्ते काँक्रिटीकरण कामांना मुदतवाढ नाही; महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांचे निर्देश
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचा पहिला टप्पा १२ डिसेंबर २०२६, तर दुसरा टप्पा मे २०२७ पर्यंत पूर्ण करावा. या कामासाठी कोणत्याही स्वरूपाची मुदतवाढ दिली जाणार नाही. नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी सध्या सुरू असलेल्या रस्त्यांची कामे ३१ मेपर्यंत पूर्ण होतील, याची दक्षता घ्यावी, असे स्पष्ट निर्देश महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी मंगळवारी आढावा बैठकीत प्रशासनाला दिले.
पालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर, उपायुक्त (पायाभूत सुविधा) गिरीश निकम, उपायुक्त (आयुक्त कार्यालय) प्रशांत गायकवाड, प्रमुख अभियंता (रस्ते), मंतय्या स्वामी यांच्यासह अभियंते या बैठकीला उपस्थित होते. काँक्रीटीकरणाच्या गुणवत्तेवर भिडे यांनी विशेष भर दिला. काँक्रीटीकरण पूर्ण झालेले, प्रगतिपथावर असलेल्या आणि लवकरच काँक्रीटीकरण सुरू होणाऱ्या रस्त्यांची माहिती ‘डॅश बोर्ड’वर स्वतंत्र रकान्यात देण्यात आली आहे.
सर्वांशी समन्वय
रस्तेकामे पूर्ण करताना पालिकेचा जलअभियंता, पर्जन्य जलवाहिन्या, पाणीपुरवठा प्रकल्प, मलनिस्सारण प्रचालन, मलनिस्सारण प्रकल्प आदी विविध विभाग आणि उपयोगिता सेवा वाहिन्यांशी संबंधित यंत्रणा यांच्यासमवेत समन्वय ठेवण्यात आला आहे.
अधिकारी, कंत्राटदारांशी थेट संपर्क साधा; माहिती ‘डॅश बोर्ड’वर उपलब्ध
आपल्या परिसरातील रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम कोणत्या कंत्राटदाराला दिले आहे, कोणत्या अभियंत्यावर जबाबदारी आहे, त्यांची नावे संपर्क क्रमांकासह ‘डॅश बोर्ड’वर उपलब्ध आहेत. नागरिकांना रस्त्याच्या कामांची सद्य:स्थिती थेट जाणून घ्यावयाची असल्यास डॅश बोर्डच्या होमपेजवर असलेल्या ‘सर्च बार’मध्ये रस्त्याचे नाव टाकल्यास सविस्तर माहिती नकाशाद्वारेही मिळेल. नागरिकांना होमपेजवरच उजवीकडील रकान्यात तक्रार नोंदविता येणार आहे.
३८९ रस्त्यांच्या कामाला लवकरच होणार सुरुवात
टप्पा १ टप्पा २ मध्ये २,११८ रस्त्यांचे (लांबी ६९१.०८ किलोमीटर) काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. यापैकी १,१७० रस्त्यांचे (लांबी ३१६.८४ किलोमीटर) काम पूर्ण झाले आहे. ५५९ रस्त्यांचे जंक्शन ते जंक्शन (१७१.४० किलोमीटर) काँक्रीटीकरण आहे. अशाप्रकारे एकूण ६९१.०८ पैकी ४८८.२४ किलोमीटर अंतराच्या रस्त्यांचे म्हणजेच ७१ टक्के काँक्रीटीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित ३८९ रस्त्यांचे (१०२.०४ किलोमीटर) काँक्रीटीकरण लवकरच सुरू होणार आहे. काँक्रीटीकरणाची सविस्तर माहिती परिमंडळ आणि प्रशासकीय विभाग स्तरावर उपलब्ध आहे. येथे नागरिकांना रस्त्याची सद्य:स्थिती दर्शविणारी छायाचित्रे पाहाता येतील.