ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 07:39 IST2025-11-16T07:37:11+5:302025-11-16T07:39:01+5:30
Mumbai RTO Driving License Scam: रस्ते अपघातावर नियंत्रण आणण्याचे आव्हान यंत्रणेसमोर असताना, स्टिअरिंगवर फक्त हात ठेवताच मुंबई आरटीओ कार्यालयात लायसन्स मिळत असल्याचा धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे.

ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
महेश कोले
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: रस्ते अपघातावर नियंत्रण आणण्याचे आव्हान यंत्रणेसमोर असताना, स्टिअरिंगवर फक्त हात ठेवताच मुंबई आरटीओ कार्यालयात लायसन्स मिळत असल्याचा धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. मुंबई सेंट्रल आरटीओमध्ये अधिकाऱ्यांच्या खुर्च्यांवर तसेच ड्रायव्हिंग टेस्टसाठीच्या वाहनांमध्ये दलाल मंडळींचे बस्तान आहे. उमेदवारांकडून जास्तीचे पैसे उकळून फक्त ड्रायव्हिंग स्टिअरिंगवर हात ठेवून परीक्षेत पास करत पक्के लायसेन्स दिले जात आहे. यापूर्वी ‘लोकमत’ने या विषयाला वाचा फोडल्यानंतर परिवहन मंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याप्रकरणी कडक कारवाईचा इशारा दिला.
धक्कादायक म्हणजे एका आरटीओ कार्यालयात दिवसाला ४०० उमेदवार परीक्षा देतात, तर ५८ आरटीओ कार्यालयांचा विचार केल्यास हाच आकडा २३ हजारांवर जातो. मुंबई सेंट्रल आरटीओ कार्यालयात सोमवारी मोटार वाहन अधिकाऱ्याऐवजी एजंटकडून ड्रायव्हिंग टेस्ट घेण्यात येत होती. विशेष म्हणजे ट्रक चालवण्याची चाचणीही सुरू होती. यावेळी ड्यूटीवरील सहा इन्स्पेक्टकडून केवळ कागदपत्रांची तपासणी करून सही करण्यात येत होती.दरम्यान, वैध-अवैध लायसन्सची नेमकी आकडेवारी समोर आलेली नाही.
प्रक्रियेत हलगर्जीपणा
ऑगस्ट महिन्यात ‘लोकमत’ने मुंबईतल्या चारही आरटीओ कार्यालयांचा आढावा घेऊन पक्क्या लायसन्स प्रक्रियेमध्ये हलगर्जीपणा होत असल्याचे उघड केले होते. त्यानंतर हलगर्जीपणा करणाऱ्या इन्स्पेक्टरवर कारवाई करण्याचा, तसेच घरी बसवण्याचा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला होता.
इन्स्पेक्टर नव्याने प्रमोट झाल्याचे दिले कारण
इन्स्पेक्टरकडून टेस्ट घेण्यात येत नसल्याबाबत त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारले असता सदर इन्स्पेक्टर हे नव्याने प्रमोट झाले असून, त्यांना मुंबईच्या स्थानिक परिस्थितीची जाणीव नाही. यापुढे अशा गोष्टी होणार नाहीत याची हमी त्यांच्याकडून घेण्यात आल्याचा दावा यांनी केला आहे.
आम्हाला लायसन्सची टेस्ट न घेतलेल्या एखाद्या उमेदवाराची माहिती दिल्यास आम्ही त्याचा तपास करू. त्यात तथ्य आढळल्यास आम्हाला अधिकाऱ्यावर कारवाई करता येईल. भरत कळसकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी, मुंबई सेंट्रल