LMOTY 2026 : "वैयक्तिक स्वार्थासाठी तडजोड केली नाही!"; मुख्यमंत्र्यांच्या उत्तरांनी जिंकली मने
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 10:08 IST2026-03-12T10:08:22+5:302026-03-12T10:08:58+5:30
प्रख्यात अभिनेता आमिर खान यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महामुलाखत. आमिर खान यांनी विविध चित्रपटातील भूमिकांचा उल्लेख करत त्या भूमिकेशी मिळता जुळता कोण राजकारणी आहे असे विचारले. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मिश्किलपणे उत्तरे देत मने जिंकली.

LMOTY 2026 : "वैयक्तिक स्वार्थासाठी तडजोड केली नाही!"; मुख्यमंत्र्यांच्या उत्तरांनी जिंकली मने
मुंबई : महाराष्ट्राच्या विकासाची गती कायम ठेवताना बदलत्या तंत्रज्ञान आणि हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरे जाण्यास राज्य सरकार सज्ज असल्याचे मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. एआयमुळे भविष्यात नोकऱ्यांच्या स्वरूपात मोठा बदल होणार असला तरी योग्य तयारी केल्यास त्यातून नव्या संधीही निर्माण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' या पुरस्कार सोहळ्यात गेट वे ऑफ इंडियाच्या साक्षीने प्रख्यात अभिनेता आमिर खान यांनी मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांची महामुलाखत घेतली. या मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्याच्या अर्थव्यवस्थेपासून युवकांच्या मानसिक आरोग्यापर्यंत अनेक मुद्द्यांवर मनमोकळेपणाने भूमिका मांडली. राजकारणातील आदर्शवादाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, वेळेनुसार परिस्थिती बदलत असते, त्यामुळे कधी कधी आपल्याला निर्णय बदलावे लागतात, पण आयुष्यात आदर्शवाद महत्त्वाचाच आहे. आदर्शवाद संपला तर तुम्ही संपलात. वेळेनुसार बदलले नाहीत तर संपलेले अनेक लोक मी बघितले आहेत. मी अनेकदा तडजोड केली, पण वैयक्तिक स्वार्थासाठी कधीच तडजोड केली नाही आणि पुढेही करणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी मुलाखतीत स्पष्ट केले.
महाराष्ट्र ही केवळ एका व्यक्तीची निर्मिती नाही
महाराष्ट्राच्या जबाबदारीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, महाराष्ट्र ही केवळ एखाद्या व्यक्तीची निर्मिती नसून अनेक संत, वीर आणि समाजसुधारकांच्या परंपरेतून उभा राहिलेला प्रदेश आहे.
देशाच्या लोकसंख्येच्या सुमारे दहा टक्के लोक महाराष्ट्रात राहतात. त्यामुळे ही मोठी जबाबदारी आहे.
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था देशातील सर्वांत मोठी आहे. महाराष्ट्र स्वतंत्र देश असता तर आपली अर्थव्यवस्था जगातील सुमारे ३०व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था ठरली असती.
सध्याच्या गतीने विकास सुरू राहिला तर पुढील काही वर्षांत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था यूएई आणि सिंगापूरपेक्षाही मोठी होऊ शकते, असे त्यांनी नमूद केले.
एआयची लाट थांबवता येणार नाही : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, एआयची लाट थांबवता येणार नाही. आजचे रोजगार बाजार पुढील हजार दिवसात पूर्णपणे बदलू शकतात. एआयमुळे काही नोकऱ्या नष्ट होतील, पण त्याहून अधिक नव्या नोकऱ्या तयार होतील. त्यामुळे मानवसंसाधनाला एआय-रेडी करणे गरजेचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
हवामान बदल हे मोठे आव्हान
हवामान बदल हे राज्यासमोरील सर्वात मोठे आव्हान असल्याचे सांगताना फडणवीस म्हणाले की, शेतीवर त्याचा थेट परिणाम होत आहे. पूर्वी ९०% पाऊस पडूनही दुष्काळ पडत असे. आता पाणलोट, जलसंधारणाच्या कामांमुळे ८५ टक्के पाऊस पडला तरी शेती वाचवता येते, असे त्यांनी सांगितले. ऊर्जा क्षेत्रातही मोठा बदल घडवून आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
शेतकऱ्यांना लागणारी ऊर्जा सौरऊर्जेकडे वळवत आहोत. शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर सोलर पॉवर देणारे पहिले राज्य होण्याच्या दिशेने आम्ही वाटचाल करत आहोत. पर्यावरण संवर्धनासाठी राज्यात ३०० कोटी झाडे लावण्याचे मिशन हाती घेतल्याचे त्यांनी सांगितले.
मानसिक आरोग्याबाबत चिंता
युवकांच्या मानसिक आरोग्याबाबतही मुख्यमंत्री फडणवीस यांनी चिंता व्यक्त केली. शहरी जीवनात एकमेकांना आधार देण्यासाठी वेळ नसतो. त्यामुळे मानसिक आरोग्याचे प्रश्न वाढत आहेत. अधिकाधिक समुपदेशक तयार करणे, योग-ध्यान यासारख्या पद्धतींचा वापर करणे आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करून लोकांना सहाय्य करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन
क्रीडेला शिक्षणात अधिक महत्त्व देण्याची गरज वाटत नाही का असे विचारले असता ते म्हणाले, त्यामुळेच देशात ‘खेलो इंडिया’सारख्या उपक्रमांद्वारे क्रीडेला प्रोत्साहन दिले जात आहे, असे ते म्हणाले.