Join us
Daily Top 2Weekly Top 5

'तुम्ही याच आम्ही वाट पाहातोय', नितेश राणेंचं शिवसैनिकांना ओपन चॅलेंज; मुंबईत राडा होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 08:44 IST

Nitesh Rane: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत खालच्या पातळीवर जाऊन केलेल्या टीकेमुळे शिवसैनिक आता चांगलेच आक्रमक झाले आहेत.

Nitesh Rane: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत खालच्या पातळीवर जाऊन केलेल्या टीकेमुळे शिवसैनिक आता चांगलेच आक्रमक झाले आहेत. यात मुंबईत राणे समर्थक आणि शिवसैनिकांमध्ये राडा होण्याची शक्यता आहे. नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनीही त्याबाबतची माहिती ट्विटरवर दिली असून शिवसैनिकांना थेट ओपन चॅलेंजही केलं आहे. 

"माझ्या कानावर आलेल्या माहितीनुसार युवासेनेचे कार्यकर्ते आमच्या जुहू येथील निवासस्थानाबाहेर जमणार आहेत. त्यामुळे एकतर मुंबई पोलिसांनी शिवसैनिकांना रोखावे. नाहीतर पुढे काय घडले तर त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही. सिंहाच्या हद्दीत पाऊल ठेवायची हिंमत करू नका. आम्हीही तुमची वाट पाहातोय", अशा शब्दांत नितेश राणे यांनी शिवसैनिकांना डिवचलं आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेलं चिथावणीखोर विधान केंद्रीय मंत्री नारायण राणेंना महागात पडण्याची शक्यता आहे. राणेंच्या विधानाप्रकरणी महाड आणि नाशिकमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. राणेंचं विधान गंभीर असून त्यांना अटक करून न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश नाशिक पोलिसांनी दिले आहेत. त्यानंतर नाशिक पोलिसांचं पथक राणेंच्या अटकेसाठी रवाना झालं आहे. राणेंची जनआशीर्वाद यात्रा सध्या कोकणात आहे. आज चिपळूणमध्ये त्यांच्या यात्रेला सुरुवात होईल. तिथेच त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. 

काय होतं राणेंचं वादग्रस्त विधान?नारायण राणे यांनी जनआशीर्वाद यात्रेवेळी काल महाड येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर राणे यांनी जोरदार प्रहार केला. मात्र, टीका करण्याच्या नादात राणे यांनी वादग्रस्त विधान केले. त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून… अरे हीरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती, असे नारायण राणे म्हणाले. या पत्रकार परिषदेला भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर उपस्थित होते. 

टॅग्स :नीतेश राणे नारायण राणे उद्धव ठाकरे