The NIA is investigating the blast case near Ambani's house | अंबानींच्या घराशेजारील स्फोटक प्रकरणाचा तपास एनआयएकडे

अंबानींच्या घराशेजारील स्फोटक प्रकरणाचा तपास एनआयएकडे

मुंबई : केंद्रीय गृह विभागाने उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराच्या परिसरात आढळलेल्या स्फोटकांनी भरलेल्या कारचा तपास केंद्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपविला आहे. सोमवारी त्याबाबतचे आदेश मिळाल्यानंतर एनआयएच्या अधिकाऱ्यांनी फेर गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. दहशतवादी संघटनांकडून हे कृत्य करण्यात आल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. २५ फेब्रुवारीला घडलेल्या या प्रकाराबाबत गावदेवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सुरुवातीला त्याचा तपास मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेकडून, तर मागील तीन दिवसांपासून दहशतवादी विरोधी पथकाकडून (एटीएस) करण्यात येत होता.

दक्षिण मुंबईतील पेडर रोडवरील अभेद्य सुरक्षाव्यवस्था असलेल्या अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्यापासून काही मीटर अंतरावर एक निनावी महिंद्रा स्कार्पिओ आढळून आली होती. त्यामध्ये जिलेटीनच्या २५ कांड्या व अंबानी कुटुंबियांसाठी धमकीचे पत्र सापडले होते. त्याचे गूढ उलगडण्यापूर्वीच आरोपींनी वापरलेल्या त्या स्कॉर्पिओचे मूळ मालक मनसुख हिरेन यांचा ५ मार्चला मुंब्रा येथील रेतीबंदर खाडीत संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळला. त्यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीनुसार एटीएसने अनोळखी इसमावर हत्येचा गुन्हा दाखल केला.

अँटिलिया बंगल्याच्या परिसरातील कॅमेऱ्यातील सर्व सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. परिसरातील नागरिक, तसेच कारमध्ये सापडलेल्या बनावट नंबर प्लेट व अन्य कागदपत्रांचा छडा लावण्यात येत आहे. मात्र, त्यातून कोणतीही ठोस माहिती अद्याप पुढे आलेली नाही. त्यामुळे विरोधी पक्षांनी केलेल्या मागणीनुसार हा तपास केंद्रीय गृह विभागाने एनआयएच्या मुंबई विभागाकडे सोपविण्याचा निर्णय घेतला.

तपासात दिरंगाई नको : गृहमंत्री देशमुख
मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास चांगल्या पद्धतीने करत होते, तपासात दिरंगाई होऊ नये, अशी अपेक्षा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केली. 

...यात नक्कीच काहीतरी काळंबेरं - मुख्यमंत्री
मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास एटीएस करीत आहे. मात्र, हा तपास एनआयएकडे देण्याचा डाव असेल तर त्यात नक्कीच काही तरी काळंबेरं आहे. आम्हीही या प्रकरणाचा कसून तपास करून सर्व बाहेर काढू. 
- उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री 

हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपासही एनआयएकडे?
दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) ‘त्या’ स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूचा छडा त्वरित न लावल्यास तोही एनआयए आपल्याकडे वर्ग करून घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 
  

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The NIA is investigating the blast case near Ambani's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.