पुढच्या वर्षी घाटकोपरवरून दहिसरला जा मेट्रोने

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 01:55 AM2019-12-23T01:55:11+5:302019-12-23T01:55:33+5:30

अंधेरी ते दहिसर मार्ग : प्रवास होणार सुखकर, वाहतूक कोंडी फुटणार, रेल्वेची गर्दीही कमी होणार असल्याचा दावा

Next year take the Metro to Dahisar from Ghatkopar | पुढच्या वर्षी घाटकोपरवरून दहिसरला जा मेट्रोने

पुढच्या वर्षी घाटकोपरवरून दहिसरला जा मेट्रोने

Next

योगेश जंगम

मुंबई : पश्चिम उपनगरामध्ये महत्त्वाचा मार्ग असलेल्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर बांधण्यात येत असलेल्या दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व हा मार्ग पुढच्या वर्षी मुंबईकरांसाठी सुरू होणार आहे. लोकलला पर्याय असणाऱ्या या मेट्रो मार्गाची मुंबईकर आतुरतेने वाट पाहत होते़ ती प्रतीक्षा आता संपणार आहे. दहिसर पश्चिम ते डी. एन. नगर या मेट्रो-२ अ आणि दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व या मेट्रो-७ या प्रकल्पाचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (एमएमआरडीए) सध्या वेगाने सुरू आहे. पुढच्या वर्षी हे दोन्ही मेट्रो प्रकल्प मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहेत. या मेट्रो प्रकल्पाशी संबंधित कामे वेगाने होत असून, वेळेवर काम पूर्ण करण्याकडे भर दिला जात आहे. मेट्रो-७ मार्गावर सहा कोचची पहिली मेट्रो जुलै २०२०पर्यंत उपलब्ध होणार आहे. त्यानंतर या मेट्रो मार्गावर चाचणी सुरू होईल, अशी माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (एमएमआरसी) देण्यात आली. या चाचणीनंतर ही मार्गिका सुरू करण्यात येणार आहे. यानंतर मेट्रो-२ अ सुरू करण्यात येणार आहे. यामुळे मुंबई आणि परिसरातील पायाभूत सुविधा आणखी मजबूत होणार असून, प्रवाशांचा प्रवास वेगवान होणार आहे.

एमएमआरडीएतर्फे पायाभूत सुविधा आणि प्रस्तावित प्रकल्पांना गती देण्यात येणार आहे. सध्या मुंबईतील सार्वजनिक परिवहन व्यवस्थेमधील मागणी आणि पुरवठ्यातील तफावतीमुळे सध्याच्या उपनगरीय रेल्वेसेवेवर प्रचंड ताण पडत आहे. ही वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रस्ते आणि रेल्वेच्या क्षमतेमध्ये वाढ करणे गरजेचे आहे. मुंबईमध्ये रेल्वे आधारित सार्वजनिक परिवहन व्यवस्था उपलब्ध व्हावी या उद्देशाने बृहत आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यातील मेट्रो मार्गाने महत्त्वाची स्थानके जोडण्यात येणार आहेत. यामध्ये चर्चगेट, छत्रपती शिवाजी टर्मिनल, मुंबई सेंट्रल, आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानतळ आणि प्रमुख व्यापारी केंद्रे जोडली जाणार आहेत. तसेच या मार्गांमुळे मुंबई शेजारील ठाणे, नवी मुंबई, वसई, विरार इत्यादी शहरे जोडली जाऊन ठिकठिकाणी परिवहन अदलाबदलीची सुविधा प्रवाशांना मिळणार आहे. सुमारे २८१.४ किमी मेट्रो मार्गाचे जाळे तयार होणार आहे. हे सर्व मेट्रो मार्ग आगामी काळात कार्यान्वित झाल्यावर दररोज सुमारे ७० लाख प्रवाशांना याचा फायदा होणार आहे़ त्यामुळे अंधेरी ते घाटकोपर व अंधेरीहून दहिसरला मेट्रोने जाता येणार आहे़

मेट्रो मार्गिकांच्या या जाळ्यामुळे दहिसर-वांद्रे पश्चिम- बीकेसी-मानखुर्द- ठाणे, तसेच अंधेरी (पूर्व), घाटकोपर, मुलुंड आणि वडाळा यांसारख्या परिसरांशी जोडणी उपलब्ध होणार आहे. यामुळे या भागांमधील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. तर कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ प्रकल्पामुळे कुलाबा, काळबादेवी, गिरगाव, महालक्ष्मी, वरळी, दादर, धारावीप्रमाणेच आंतरदेशीय आणि आंतरराष्ट्रीय विमानतळाप्रमाणच एम.आय.डी.सी. आणि सीप्झसारख्या परिसरांशी जोडणी होणार आहे. ही मार्गिका पश्चिम रेल्वेला पर्याय असल्याने रेल्वेमार्गावरील गर्दी कमी होण्यासही मदत होणार आहे. हे सर्व मेट्रो मार्ग एकामेकांशी संलग्न असतील. तसेच मोनो मार्ग आणि रेल्वेसेवांशीही जोडणी उपलब्ध असणार आहे.

एमएमआरडीएचे प्रस्तावित प्रकल्प

मेट्रो-२ (अ) : दहिसर पश्चिम ते डी. एन. नगर हा मेट्रो-२ अ प्रकल्प प्रस्तावित आहे. हा संपूर्णत: उन्नत मार्ग असून लिंक रोडवर ही मार्गिका बांधण्याचे काम सुरू असून या मार्गाच्या कामाला गती आली आहे. १८.६ कि. मी. लांब असलेल्या या मार्गावर सतरा स्थानके असणार आहेत. या प्रकल्पासाठी ६ हजार ४१० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. या मार्गावर २०२१ सालापर्यंत दररोज ४ लाख ७ हजार प्रवासी प्रवास करू शकतील. पश्चिम उपनगरातील वर्दळीचा भाग म्हणून लिंक रोडची ओळख आहे. हा मेट्रो प्रकल्प मुंबईकरांच्या सेवेत पुढील वर्षी दाखल होणार आहे. या मेट्रो प्रकल्पाशी संबंधित कामे वेगाने होत असून, वेळेवर काम पूर्ण करण्याकडे भर दिला जात आहे.

मेट्रो-२ (ब) : डी. एन. नगर ते मानखुर्द असा हा मेट्रो-२ ब प्रकल्प एमएमआरडीएतर्फे प्रस्तावित असून या मार्गिकेची लांबी २३.५ कि. मी. लांब इतकी आहे. प्रकल्पासाठी अपेक्षित खर्च १० हजार ९८६ कोटी रुपये इतका येणार आहे. मार्गिकेवर २२ स्थानके असतील. प्रत्येक मेट्रोला आठ डबे असणार आहेत. २०२१ रोजी मेट्रो सुरू झाल्यावर दरदिवशी साधारणत: ८ लाख ९ हजार प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. मेट्रो-१, मेट्रो-३, मेट्रो-४, मोनोरेल आणि उपनगरीय रेल्वे असे प्रकल्प जोडण्यात येणार असल्याने अशा मार्गावर सुलभतेने प्रवास करणे शक्य होणार. या प्रकल्पामुळे इंधन, वेळ जतन होणार असून, पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल, असे प्राधिकरणातर्फे सांगण्यात आले आहे. या मार्गावरील मेट्रो कोचसाठी भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (बीईएमएल) यांना कंत्राट देण्यात आले असून, काम सुरू आहे. यावरील सिग्नल आणि संवाद यंत्रणेसाठी अलस्टॉम लिमिटेड यांना कंत्राट देण्यात आले आहे. याबाबतचा करार ८ मार्च २०१९ रोजी करण्यात आला असून, ४५ महिन्यात काम पूर्ण करण्यात येणार आहे.

मेट्रो-३ : कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ अशी ही मार्गिका संपूर्णत: भुयारी असणार आहे. या मार्गिकेच्या भुयारी मार्गिकेच्या कामाला आता वेग आला आहे. मुंबई मेट्रो रेल कॉपोर्रेशन लिमिटेडमार्फत (एमएमआरसीएल) हे काम करण्यात येत आहे. संपूर्णत: भुयारी असलेल्या मार्गिकेची लांबी ३.५ कि.मी. इतकी असून, या मार्गिकेवर २७ स्थानके स्थानके असणार आहेत. प्रकल्पाची अंदाजित किंमत २३,१३६ कोटी रुपये इतकी असून, एमएमआरसीएलकडून मार्गिकेच्या बांधकामाचे पाच कंपन्यांना सात टप्प्यात काम देण्यात आले आहे. टनेल बोरिंग मशिन्समार्फत मार्गिकेच्या भुयारीकरणाच्या कामाला आता गती आली आहे. आतापर्यंत मार्गिकेच्या भुयारीकरणाचे काम ७२ टक्क्यांपर्यंत पूर्ण करण्यात आले आहे.

मेट्रो-४ : वडाळा-घाटकोपर-ठाणे-मुलुंड- कासारवडवली अशी ही मेट्रो मार्गिका प्रस्तावित असलेल्या ३२.३२ कि.मी. लांबीच्या (पूर्णत: उन्नत) मार्गिकेसाठी १४ हजार ५४९ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. प्रत्येक मेट्रो गाडीला सहा डबे असतील. या मार्गिकेवर एकूण ३२ स्थानके बांधण्यात येणार आहे. दरदिवशी वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली या मार्गावर २०२१ रोजीपर्यंत ८ लाख ७० हजार प्रवासी, तर २०३१ रोजीपर्यंत १२ लाख १० हजार प्रवासी प्रवास करतील. या प्रकल्पामुळे इंधन, वेळ वाचणार असून, पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल, असा दावा प्राधिकरणाद्वारे करण्यात आला आहे. या मार्गिकेच्या विकासकामांसाठीच्या खरेदी आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे. मेट्रो-४ आणि ४ अ मार्गिकांशी संबंधित कामे वेगाने सुरू आहेत. रोलिंग स्टॉक, सिग्नलिंग, ट्रेन कंट्रोल आदींबाबतच्या कामांचे करार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. २० डिसेंबर २०१९ रोजी रोलिंग स्टॉकची निविदा काढण्यात आली आहे.


मेट्रो-५ : ठाणे-भिवंडी-कल्याण अशी मेट्रो-५ची मार्गिका असणार आहे. या मार्गिकेमुळे ठाणे आणि परिसरातील रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. ठाणे ते कल्याण अशा २४.९ कि.मी. लांबीच्या या मार्गावर १७ स्थानके असणार आहेत. या मार्गावर दररोज सुमारे २ लाख २९ हजार प्रवासी प्रवास करू शकतील, असा अंदाज प्राधिकरणाने वर्तवला आहे. या मार्गिकेच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.

मेट्रो -६ : स्वामी समर्थनगर ते विक्रोळी (जेव्हीएलआर मार्गे) मेट्रो-६ मार्गिका : ही मार्गिका जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडमार्गे (जेव्हीएलआर) बांधण्यात येत आहे. १४.४७ कि.मी. लांबीच्या या मार्गिकेसाठी ६ हजार ७१६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या मार्गिकेवर १३ स्थानके असणार आहेत. २०२१ सालामध्ये सुरू होणाºया या मार्गावर दररोज साडेसहा लाख प्रवासी प्रवास प्रवास करू शकतील, असा अंदाज प्राधिकरणाद्वारे वर्तवण्यात आला आहे. या मार्गिकेच्या कामाला गती आली आहे.

मेट्रो- ७ : अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व या मार्गिकेच्या कामाला आता गती आली आहे. एमएमआरडीएतर्फे दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व या पश्चिम द्रु्रुतगती महामार्गावर ही मार्गिका बांधण्यात येणार आहे. या मार्गिकेवरील वाहतुकीवर परिणाम होऊ नये म्हणून एमएमआरडीए आणि वाहतूक विभागामार्फत उपाययोजना करण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी ६ हजार २०८ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. १६.५ कि.मी. लांबीच्या या मार्गावर दहिसर (पूर्व) अशी १३ स्थानके असणार आहेत. या मार्गावर २०२१ सालात दररोज ४ लाख ७ हजार प्रवास करू शकतील, असा दावा प्राधिकरणाने केला आहे. बांधकाम ८० टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले असून पुढच्या वर्षी ही मार्गिका सुरू होईल.

मेट्रो-८ : अंधेरी-छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ-मानखुर्द-नवी मुंबई-आंतरराट्रीय विमानतळ असा मेट्रो-८चा अतिजलद मार्ग होणार आहे. या मार्गामुळे छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या दोन्ही विमानतळांना एकसंघगतीने जोडण्यात येणार आहे. तसेच प्रस्तावित जलद मार्ग हा मुंबई आणि नवी मुंबई यांच्यातील प्रादेशिक जोडणी मार्ग म्हणून कार्यरत असणार आहे.

Web Title: Next year take the Metro to Dahisar from Ghatkopar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.