"ही युती म्हणजे मराठी माणसाला गाडू पाहणाऱ्या शक्तींविरुद्धचं युद्ध"; राज ठाकरेंनी स्पष्ट केली युतीची दिशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 17:00 IST2025-12-24T16:40:48+5:302025-12-24T17:00:28+5:30

मुंबईचा महापौर हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेचा असेल आणि तो निर्विवादपणे मराठीच असेल, असेही राज ठाकरे म्हणाले.

Next Mumbai Mayor Will Be Ours and Undeniably Marathi Raj Thackeray Declares After Historic Alliance | "ही युती म्हणजे मराठी माणसाला गाडू पाहणाऱ्या शक्तींविरुद्धचं युद्ध"; राज ठाकरेंनी स्पष्ट केली युतीची दिशा

"ही युती म्हणजे मराठी माणसाला गाडू पाहणाऱ्या शक्तींविरुद्धचं युद्ध"; राज ठाकरेंनी स्पष्ट केली युतीची दिशा

Raj Thackeray: गेल्या दोन दशकांपासून ज्या राजकीय भूकंपाची महाराष्ट्र वाट पाहत होता, तो अखेर आज झाला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे या दोन भावांनी महापालिका निवडणुकीसाठी ऐतिहासिक युतीची घोषणा केली. वरळीतील ब्लू सी हॉटेलमध्ये झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेनंतर राजकीय वातावरण तापले असतानाच, राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत थेट मुंबईच्या महापौरपदावर दावा ठोकला आहे.

पत्रकार परिषदेत चौफेर फटकेबाजी केल्यानंतर राज ठाकरे यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली. यात त्यांनी म्हटले की, "येणाऱ्या महापालिका निवडणुकीनंतर मुंबईचा महापौर हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेचा असेल आणि तो निर्विवादपणे मराठीच असेल." या विधानातून राज ठाकरेंनी केवळ युतीची ताकदच स्पष्ट केली नाही, तर मुंबईवरील ठाकरे ब्रँडचे वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्याचा निर्धारही व्यक्त केला आहे.

जागावाटपाचा सस्पेन्स आणि रणनीती

जागावाटपाबाबत बोलताना राज ठाकरे यांनी स्पष्ट केले की, सध्या युतीवर शिक्कामोर्तब झाले आहे. कोणत्या मतदारसंघातून कोण लढणार आणि जागांचा नेमका आकडा काय असेल, याचा तपशील योग्य वेळी दोन्ही पक्षांचे संबंधित नेते जाहीर करतील.

"आज २४ डिसेंबर २०२५ रोजी, मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना, या दोन पक्षांची आगामी महापालिका निवडणुकांसाठीची युती घोषित झाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष म्हणून मी आणि शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे अशी आम्ही दोघांनी या युतीची अधिकृत घोषणा संयुक्त पत्रकार परिषदेत केली. ही युती बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित होती. आणि या सगळ्याची सुरुवात, मी एका मुलाखतीत दिलेल्या वाक्यातून झाली. कुठल्याही वादापेक्षा आणि भांडणांपेक्षा आपला महाराष्ट्र आणि मराठी माणूस मोठा आहे.' हे माझं वाक्य होतं. हे निव्वळ मुलाखतीतलं वाक्य नाहीये, तर ही तीव्र भावना आहे," असं राज ठाकरे म्हणाले.

"आणि यातूनच हे २ पक्ष एकत्र आले आहेत. बाकी युतीची घोषणा झाली. आता कोणाला कुठल्या आणि किती जागा मिळणार याची उत्तरं लवकरच मिळतील. त्यावर आजच्या व्यासपीठावर कुठलीही माहिती सांगितली नाही, कारण त्या तांत्रिक बाबी आहेत. युती ही किती जागा, कुठल्या जागा यासाठी नाहीये. ती आज मराठी माणसाचं मुंबई आणि परिसर पण उद्या राज्याच्या इतर भागातून अस्तित्व मिटवण्याचा जो प्रयत्न सुरु आहे, त्या शक्तींना गाडून टाकण्यासाठीची ही युती आहे. त्यामुळे जागावाटप आणि त्याचा तपशील योग्य वेळी संबंधित व्यक्ती घोषित करतील. मुंबईचा महापौर हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेचा असेल आणि तो निर्विवादपणे मराठीच असेल," असं राज ठाकरेंनी म्हटलं.

"आज वर्तमानपत्रं असोत किंवा वृत्तवाहिन्या, त्यांचे बहुसंख्य संपादक, पत्रकार आणि तिथे काम करणारी इतर मंडळी ही कडवट मराठी प्रेमी आहेत. आणि त्यांना मराठी भाषेच्या विरोधात आणि मराठी माणसाच्या विरोधात जे षडयंत्र सुरु आहे ते आवडत नाहीये. त्यातले अनेक जणं त्यांचा रोष त्यांच्या पत्रकारितेतून व्यक्त करतात, तर काही खाजगीत व्यक्त होतात, असं राज ठाकरे म्हणाले.

"माझी सगळ्यांना विनंती आहे की यावेळेस तुमच्या मालकांना आणि त्यांच्या मालकांना काय वाटतं यापेक्षा तुमच्या सद्सद्विवेक बुद्धीला काय वाटतं, पटतं तेच मांडा, बोला. ही दोन पक्षांची लढाई नाही तर ही मराठी माणसाची लढाई आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळेस जशी तत्कालीन माध्यमं मराठी माणसाच्या पाठीशी उभी राहिली तसं यावेळेस तुम्ही उभे रहा. कारण मराठी भाषा आणि मराठी माणूस टिकला तर तुमचं अस्तित्व टिकेल. सभांच्या वेळेस मराठी बांधव-भगिनींच्या दर्शनाचा योग येईलच. तोपर्यंत सर्वांना सस्नेह जय महाराष्ट्र!" असंही राज ठाकरे म्हणाले.
 

Web Title : गठबंधन मराठी लोगों को दफनाने वाली ताकतों के खिलाफ युद्ध है।

Web Summary : राज ठाकरे ने मुंबई चुनाव के लिए शिवसेना के साथ गठबंधन की घोषणा की, जिसका लक्ष्य मराठी महापौर है। उन्होंने मराठी पहचान की रक्षा के लिए एकता पर जोर दिया, मीडिया से समर्थन का आग्रह किया।

Web Title : Alliance is a war against forces trying to bury Marathi.

Web Summary : Raj Thackeray announced an alliance with Shiv Sena for Mumbai elections, aiming for a Marathi mayor. He emphasized unity to protect Marathi identity, urging media support.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.