New sweeping of all hospitals in Mumbai; Municipal Corporation more aware after Bhandara fire incident | मुंबईतील सर्व रुग्णालयांची झाडाझडती सुरू; भंडारा अग्निप्रकरणानंतर महापालिका अधिक जागरूक

मुंबईतील सर्व रुग्णालयांची झाडाझडती सुरू; भंडारा अग्निप्रकरणानंतर महापालिका अधिक जागरूक

मुंबई : भंडारा जिल्ह्यातील रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीने संपूर्ण देश हळहळला. रुग्णालयातच रुग्णांच्या जीवाशी कसा खेळ सुरू असतो हे या घटनेने दाखवून दिले. या घटनेचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर मुंबईतील रुग्णालयांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. मोठी रुग्णालये सोडल्यास मुंबईतील अनेक भागांमध्ये छोटी रुग्णालये, नर्सिंग होम सुरू असतात. गोवंडी-मानखुर्द, शिवाजीनगर या विभागात तब्बल ४० हून अधिक नोंदणी नसलेली रुग्णालये सुरू असल्याची धक्कादायक बाब माहितीच्या अधिकाराखाली उजेडात आली आहे. गेल्या वर्षी दोन रुग्णालयांमध्ये आग लागण्याच्या घटना घडल्या. एका घटनेने उपचार घेत असलेल्या वृद्धाचा बळी घेतला. तर दुसऱ्या घटनेत परिचारिका, डॉक्टरांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. भंडारा जिल्ह्यातील आगीच्या दुर्घटनेनंतर पालिका प्रशासनाने सर्व रुग्णालयांची नव्याने झाडाझडती घेण्यास सुरुवात केली आहे. 

वर्षभरापूर्वीचा प्रसंग
ऑक्टोबर २०२०मध्ये मुलुंड येथील खासगी रुग्णालयात लागलेल्या आगीमुळे वीजपुरवठा खंडित झाला. यावेळी तातडीने रुग्णालयातील ४० रुग्णांना इतर रुग्णालयात दाखल करीत असताना एका रुग्णाचा मृत्यू झाला. 
तर दुसऱ्या एका घटनेत दहिसर, कांदरपाडा परिसरात कोविड रुग्णालयात अतिदक्षता उपचार केंद्रात एका रुग्णाच्या शेजारी असलेल्या वैद्यकीय उपकरणाला अचानक आग लागली. यावेळी प्रसंगावधान राखत तेथे उपस्थित परिचारिकांसह वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही आग विझवली.

मुंबईतील सर्वच रुग्णालयांची पहिल्यापासून तपासणी मोहीम सुरू केली आहे. प्रत्येक बारीकसारीक गोष्टींचे बारकाईने निरीक्षण करून अहवाल तयार केला जात आहे. त्यानंतरच ना हरकत प्रमाणपत्र किती जणांकडे नाही? कोण नियमाचे उल्लंघन करीत आहे, हे स्पष्ट होईल. - सुरेश काकाणी, अतिरिक्त महापालिका आयुक्त

असा सुरू आहे आगीशी खेळ
मुंबईतील बहुतांश रुग्णालयांमध्ये अग्निरोधक यंत्रणा कार्यान्वित नाही, फायर एक्सटिग्विशसारख्या अनेक गोष्टी नाहीत, आपत्तीकाळात बाहेर पडण्याच्या मार्गात अडथळे आहेत, अशा पद्धतीने सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: New sweeping of all hospitals in Mumbai; Municipal Corporation more aware after Bhandara fire incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.