Mumbai Local: दादर स्टेशनवर नवी रेल्वे मार्गिका, नव्या प्लॅटफॉर्मच्या कामाला गती; मोठा दिलासा मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 17:39 IST2025-12-11T17:38:01+5:302025-12-11T17:39:10+5:30
पश्चिम रेल्वे दादर स्टेशनवर नवीन रेल्वे मार्गिका आणि प्लॅटफॉर्म उभारत असून पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Mumbai Local: दादर स्टेशनवर नवी रेल्वे मार्गिका, नव्या प्लॅटफॉर्मच्या कामाला गती; मोठा दिलासा मिळणार
महेश कोले
पश्चिम रेल्वे दादर स्टेशनवर नवीन रेल्वे मार्गिका आणि प्लॅटफॉर्म उभारत असून पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या मेल आणि एक्स्प्रेससाठी येथे ६ आणि ७ हे दोनच प्लॅटफॉर्म असून भविष्यातील गरज लक्षात घेऊन नवीन मार्गिका उभारण्यात येत आहे. नव्या प्लॅटफॉर्मला ८ क्रमांक देण्यात येणार आहे.
पश्चिम रेल्वेवर सध्या एमयूटीपी प्रकल्पांतर्गत ५ व्या आणि ६ व्या मार्गिकेचे काम सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून दादर स्टेशनवर नवीन मार्गिका तयार करण्यात येत आहे. तिचा अंदाजे खर्च ७० कोटी रुपये आहे. तसेच या ठिकाणी सद्य:स्थितीत प्लॅटफॉर्म क्रमांक ७ असून त्याच्या पूर्वेला असलेल्या जागेत नव्या मार्गिकेची आणि प्लॅटफॉर्मची उभारणी करण्यात येत आहे.
सध्या हे होम प्लॅटफॉर्म असले तरी भविष्यात मार्गिका तयार झाल्यावर ते होम प्लॅटफॉर्म बनणार आहे. सध्या प्लॅटफॉर्म ६ आणि ७ वरुन ९ प्लॅटफॉर्म रिटर्न ट्रेन चालविण्यात येत असून नव्याने उभारण्यात येणाऱ्या या प्लॅटफॉर्मवरुन त्यांची संख्या वाढवण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मिनी-टर्मिनलसारख्या पायाभूत सुविधा मिळणार...
नवीन मार्गिकेच्या बांधकामामुळे दादर स्टेशनची ऑपरेशनल क्षमता वाढणार आहे. नवीन ओव्हर हेड वायरचे फिटिंग्ज, सिग्नलिंग सिस्टम आणि क्रॉसओवर पॉइंट्स बांधले जातील. रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, या संपूर्ण कामामुळे दादरला मिनी-टर्मिनलसारखी पायाभूत सुविधा मिळण्यास मदत होईल तसेच सहाव्या मार्गाचे काम माहीमपर्यंत पूर्ण झाले आहे. भविष्यात ही मार्गिका मुंबई सेंट्रलपर्यंत जोडण्यात येणार आहे. त्यासाठी दादरमधील प्लॅटफॉर्म क्रमांक ६ बंद करावा लागणार असल्याने नवीन प्लॅटफॉर्म उपयुक्त ठरणार आहे.
६०० मीटर लांबी नवीन मार्गिकेची असणार आहे. तर दादर स्टेशनवर नवीन मार्गिका तयार करण्यात येत आहे तिचा अंदाजे खर्च ७० कोटी रुपये येणार आहे.
प्रवासी सुविधांचा विस्तार करण्याच्या दृष्टीने आम्ही मार्गिकांची आणि टर्मिनसची उभारणी करत आहोत. दादर स्टेशनवर उभारण्यात येणारी नवीन मार्गिका त्याचाच एक भाग असून याठिकाणावरुन अतिरिक्त ट्रेन चालवणे शक्य होणार आहे.
- विनीत अभिषेक, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे
बांधकामादरम्यान नव्या मार्गासाठी हे बदल होणार
१. बांधकामादरम्यान दादर रेल्वे कॉलनीची भिंत, दक्षिणेकडील पादचारी पुलाचा एक भाग आणि दादर तिकीट केंद्राचा जिना पाडून तो पुन्हा बांधला जाईल. यार्ड मास्टरचे कार्यालय थोडे पूर्वेकडे हलवले जाईल.
२. ओव्हरहेड वायर, सिग्नलिंग आणि टेलिकम्युनिकेशन मध्येही अनेक तांत्रिक बदल केले जातील
३. या ठिकाणी मध्य रेल्वेच्या मार्गिका देखील असल्याने संपूर्ण दादर स्टेशनवरच्या प्लॅटफॉर्मचे क्रमांक देखील बदलण्यात येऊ शकतात, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.