जैन मंदिराशेजारील इमारतीच्या छतावर नवा कबुतरखाना सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 07:32 IST2025-08-13T07:32:02+5:302025-08-13T07:32:27+5:30
हजारोंच्या संख्येने कबुतरांचा थवा इमारतीवर जमा होत असून परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास

जैन मंदिराशेजारील इमारतीच्या छतावर नवा कबुतरखाना सुरू
मुंबई : दादर परिसरात कबुतरखाना बंद करण्याचे उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश असतानाही स्थानिक पातळीवर त्याला धाब्यावर बसवले जात असल्याचे समोर आले आहे. जैन मंदिराशेजारील एका इमारतीच्या छतावर अनधिकृतपणे नव्याने कबुतरखाना सुरू करून तेथे दाण्याची पोती टाकली जात आहेत. त्यामुळे हजारोंच्या संख्येने कबुतरांचा थवा इमारतीवर जमा होत असून परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो आहे.
उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर मुंबई महापालिकेने दादरच्या कबुतरखान्यावर कारवाई केली. काही दिवसांपूर्वी पालिकेने हा कबुतरखाना पोलिसांच्या सुरक्षेत चारही बाजूने ताडपत्रीने झाकला. येथे कबुतरांना खाद्य घातल्यास कारवाई करण्याचा इशारा पालिकेने दिला.
कारवाईची मागणी पालिकेच्या या कारवाई विरोधात जैन समुदायाने आक्रमक होत तीव्र विरोध केला. गेल्या आठवड्यात दादरमधील कबुतरखान्यावर लावलेल्या ताडपत्रीमुळे रहिवाशांनी संताप व्यक्त करत आंदोलन केले होते. त्यानंतर झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने कबुतरखान्यावरील बंदी कायम ठेवली. न्यायालयाच्या निर्देशानंतर सोमवारी पालिकेने कबुतरखान्याला पुन्हा ताडपत्री लावत बंदिस्त केला. आता काही जणांनी येथील जैन मंदिराच्या जवळच्या इमारतीच्या छतावर अनधिकृतपणे कबुतरांना खाणे देण्याचे सुरू केले आहे. स्थानिक रहिवाशांचे . स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे की, कबुतरांच्या मोठ्या संख्येमुळे आरोग्यविषयक समस्या निर्माण होत आहेत. तसेच, न्यायालयीन आदेशाचे उघडपणे उल्लंघन होत असून प्रशासनाने तत्काळ कारवाई करण्याची गरज असल्याची मागणी त्यांनी केली.