Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 11:22 IST2025-11-05T11:18:33+5:302025-11-05T11:22:19+5:30
Mumbai Monorail Accident: चेंबूर ते वडाळा मार्गावर मोनोरेलच्या नव्या गाडीची चाचणी सुरू असताना वडाळा स्थानकाजवळ बुधवारी सकाळी अपघात घडला आहे.

Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
मुंबईच्या मोनोरेलला लागलेलं अपघातांचं ग्रहण काही सुटताना दिसत नाही. चेंबूर ते वडाळा मार्गावर मोनोरेलच्या नव्या गाडीची चाचणी सुरू असताना वडाळा स्थानकाजवळ बुधवारी सकाळी अपघात घडला आहे. मोनोरेलचा पहिला डबा थेट ट्रॅक सोडून बाहेर आला. सुदैवाने तो मोनोरेलच्या खांबांवरच अडकून राहिला असल्याने मोनोचा चालक मोठ्या अपघातातून बचावला आहे. घटनास्थळावर अग्निशमन दल पोहोचले आणि चालकाची सुखरुप सुटका केली आहे. अपघात घडला त्यावेळी मोनोमध्ये चालक आणि एक कंपनीचा अधिकारी उपस्थित होता अशी माहिती समोर आली आहे. अपघाताचे कारण अद्याप कळू शकलेले नाही.
प्राथमिक माहितीनुसार, मोनोच्या सिग्नल प्रणालीत तांत्रिक बिघाड झाल्याने अपघात घडल्याचे बोलले जात आहे. या घटनेबाबत मोनोरेल प्रशासनाकडून अद्याप कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही.
सततच्या अपघात सत्रामुळे मोनोरेल सेवा प्रवासी वाहतुकीसाठी बंद करण्यात आली होती. त्यानंतर नव्या कोचेससह सध्या या मार्गावर चाचणी सुरू होती. या चाचण्यांनंतर नव्या वर्षात मोनोरेल पुन्हा सेवेत दाखल करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. पण आजच्या अपघातामुळे पुन्हा एकदा संशयाचं वातावरण निर्माण झालं आहे. घटनास्थळावर सध्या अपघातग्रस्त मोनोरेल मुख्यमार्गावरुन बाजूला करण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे.