New guidelines for cybersecurity for banks; RBI proposal | बॅँकांच्या सायबर सुरक्षिततेसाठी नवी मार्गदर्शक सूत्रे; रिझर्व्ह बॅँकेचा प्रस्ताव
बॅँकांच्या सायबर सुरक्षिततेसाठी नवी मार्गदर्शक सूत्रे; रिझर्व्ह बॅँकेचा प्रस्ताव

मुंबई : बॅँकांच्या एटीएमसाठी असलेल्या स्विच अ‍ॅप्लिकेशनची सेवा पुरविणाऱ्या विविध एजन्सींसाठी सायबर सुरक्षिततेची नवीन मार्गदर्शक सूत्रे भारतीय रिझर्व्ह बॅँक तयार करीत असून येत्या महिनाअखेरीस ती लागू केली जातील. यामुळे देशातील व्यापारी तसेच नागरी सहकारी बॅँकांची एटीएम केंद्रे अधिक सुरक्षित होतील.

मागील सप्ताहामध्ये रिझर्व्ह बॅँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीनंतर काढण्यात आलेल्या पत्रकामध्ये ही बाब स्पष्ट करण्यात आली आहे. देशातील व्यापारी तसेच नागरी सहकारी बॅँकांपैकी अनेक बॅँका एटीएम स्विच अ‍ॅप्लिकेशनसाठी बाहेरच्या अन्य एजन्सींवर अवलंबून असतात.

या एजन्सींची सायबर सुरक्षितता फारशी मजबूत नसल्यास या एटीएमची आणि पर्यायाने संबंधित बॅँकांची सुरक्षितता धोक्यात येण्याची शक्यता असते. हा धोका लक्षात घेऊन या बाहेरच्या एजन्सींनी सायबर सुरक्षिततेबाबत किमान कोणते निकष पूर्ण करावयास हवेत याची मार्गदर्शक सूत्रे रिझर्व्ह बॅँक तयार करणार आहे. ही सूत्रे या महिनाअखेरपर्यंत जाहीर होणार आहेत.

ठराविक काळानंतर तपासणीचे बंधन

देशातील नागरी सहकारी बॅँकांसाठीही ही मार्गदर्शक सूत्रे अंमलात आणली जाणार आहेत. यामुळे नागरी सहकारी बॅँकांची सायबर सुरक्षा आणखी मजबूत होणार असल्याचे रिझर्व्ह बॅँकेने स्पष्ट केले आहे. या मार्गदर्शक सूत्रांच्या अंमलबजावणीमध्ये नागरी सहकारी बॅँकांना आपल्या बॅँकेचे ईमेल डोमेन तयार करावा लागणार आहे. त्याचप्रमाणे आपल्या सायबर सुरक्षेची ठराविक काळानंतर तपासणी करण्याचे बंधनही त्यांच्यावर असेल. याशिवाय सिक्युरिटी आॅपरेशन सेंटरची उभारणी करणे आणि रिपोर्टिंग यंत्रणा तयार करण्याचे बंधनही या बॅँकांवर राहील. यामुळे या बॅँकांच्या खातेदारांना अधिक सुरक्षितता मिळणार आहे.

Web Title: New guidelines for cybersecurity for banks; RBI proposal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.