Mumbai: सार्वजनिक ठिकाणी वाहन धुतल्यास ₹५०० दंड, उघड्यावर लघवी-शौच केल्यास...पालिकेचा कठोर निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 12:48 IST2025-11-22T12:47:28+5:302025-11-22T12:48:05+5:30
BMC: मुंबईत सार्वजनिक ठिकाण अस्वच्छता करणाऱ्यांना जरब बसावी यासाठी महापालिकेने दंडाच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

Mumbai: सार्वजनिक ठिकाणी वाहन धुतल्यास ₹५०० दंड, उघड्यावर लघवी-शौच केल्यास...पालिकेचा कठोर निर्णय
जयंत होवाळ
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: मुंबईत सार्वजनिक ठिकाण अस्वच्छता करणाऱ्यांना जरब बसावी यासाठी महापालिकेने दंडाच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार उघड्यावर लघवी-शौच करणाऱ्यांकडून ५०० दंड आकारण्यात येणार आहे. तर, अनधिकृत ठिकाणी डेब्रिज कचरा टाकल्यास २० हजार रुपयांची वसुली करण्यात येणार आहे.
सार्वजनिक ठिकाणी वाहन धुतल्यास ५०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. पालिकेने नव्या स्वच्छता उपनियमांना मंजुरीची प्रक्रिया वेगाने सुरू केली आहे. २००६ च्या उपनियमांच्या तुलनेत हे वाढीव दंड असून नागरिकांना शिस्तभंगापासून दूर राहण्याचे स्पष्ट संकेत महापालिकेने दिले आहेत.
दंडाच्या रकमेवर दृष्टिक्षेप
| प्रकार | २००६ मधील दंड | नवीन दंड |
| रस्ता, पदपथावर शौच | ₹ २०० | ₹ ५०० |
| उघड्यावर अंघोळ करणे | ₹ १०० | ₹ ५०० |
| थुंकणे | ₹ २०० | ₹ २५० |
| उघड्यावर लघुवी करणे | ₹ २०० | ₹ ५०० |
| सार्वजनिक ठिकाणी प्राण्यांना खाऊ घालणे | ₹ ५०० | ₹ ५०० |
कारवाईचे दिले अधिकार
मुंबई महापालिकेने स्वच्छतेसाठी क्लीनअप मार्शल ही मोहीम हाती घेतली होती. परंतु भ्रष्टाचार, खंडणी उकळणे आदी कारणांमुळे ती बदनाम झाल्यामुळे ती रद्द करून टाकली. त्याऐवजी विविध कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनाच स्वच्छतेवर लक्ष ठेवण्यासाठी विभाग दिले असून अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाईचे अधिकारही त्यांना दिले आहेत.