Join us
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून मुंबई-पुणे महामार्गावर नवीन 8 शिवनेरी बसेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2019 16:47 IST

गेली १५ वर्षे मुंबई-पुणे  मार्गावर एसटीची शिवनेरी ही बससेवा या मार्गावरील कोणत्याही दळणवळण सेवेपेक्षा किफायतशीर, सुरक्षित व आरामदायी प्रवासी सेवा देत आहे.

मुंबई: परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिलेल्या निर्देशानुसार शिवनेरीच्या तिकीट दरात भरघोस कपात केल्यानंतर मिळणारा प्रवासी प्रतिसाद लक्षात घेऊन एसटीने  मुंबई-पुणे महामार्गावर नवीन २० शिवनेरी बसेस सुरु करण्याचा संकल्प सोडला आहे. त्यापैकी ८ बसेस मुंबई-पुणे मार्गावर आजपासून (शुक्रवार) सुरु करण्यात आल्या असून त्यामुळे या मार्गावर तब्बल ३२ नव्या फेऱ्यांची भर पडली आहे. 

गेली १५ वर्षे मुंबई-पुणे  मार्गावर एसटीची शिवनेरी ही बससेवा या मार्गावरील कोणत्याही दळणवळण सेवेपेक्षा किफायतशीर, सुरक्षित व आरामदायी प्रवासी सेवा देत आहे. सध्या मुंबई-पुणे मार्गावर दिवसाभरात २७२ फेऱ्या सुरु असून त्यामध्ये आज पासून सुरु झालेल्या ३२ फेऱ्यांची वाढ झालेली आहे. यामुळे दादर-पुणे, दादर-स्वारगेट, बोरिवली-स्वारगेट, ठाणे-स्वारगेट अशा विविध मार्गावर आज पासून ३०४ फेऱ्या दररोज चालणार आहे. त्याचा फायदा या सेवेचा लाभ घेणाऱ्या असंख्य प्रवाशांना होणार आहे. गेल्या महिनाभरामध्ये तिकीट दरात  कपात केल्यामुळे मागील वर्षाचा तुलनेत एका महिन्यात अंदाजे २१ हजार प्रवाशांची वाढ झालेली आहे. 

विशेष म्हणजे शिवनेरी मध्ये महिला प्रवाशांसाठी ३ ते १२ अशी दहा आसने आरक्षित आहेत. साहजिकच सुरक्षित व सुखकर प्रवासासाठी महिला प्रवाशांची पहिली पसंती हि शिवनेरी आहे वाढलेल्या फेऱ्या व कमी झालेले तिकीट दर याचा जास्तीत-जास्त फायदा प्रवाशांनी घ्यावा असे आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात आले  आहे.- जनसंपर्क अधिकारी

टॅग्स :महाराष्ट्रएसटी