तीस वर्षांपासून वास्तव्य, भारतीय मतदार ओळखपत्रासह नेपाळी महिलेला डोंबिवलीतून अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 13:11 IST2025-10-29T13:11:00+5:302025-10-29T13:11:24+5:30
आधार, पॅनकार्ड हस्तगत, काठमांडू येथून मुंबईपर्यंत विमानाने केला प्रवास

तीस वर्षांपासून वास्तव्य, भारतीय मतदार ओळखपत्रासह नेपाळी महिलेला डोंबिवलीतून अटक
गौरी टेंबकर - कलगुटकर
मुंबई : मतदार याद्यांच्या विशेष सखोल तपासणी (एसआयआर) वरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच मूळची नेपाळची रहिवासी असलेल्या एका महिलेला भारतीय मतदार ओळखपत्रासह डोंबिवलीतून ताब्यात घेण्यात आले आहे.
शांती अर्जुनसिंग थापा ऊर्फ चंदा गणेश रेग्मी (४९) असे या महिलेचे नाव असून, या महिलेला विमानतळावरील इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. तिला पुढील चौकशीसाठी सहार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. विशेष म्हणजे थापा गेल्या ३० वर्षापासून डोंबिवलीत राहात असल्याची माहिती समोर आली आहे. तिच्याकडून आधार आणि पॅन कार्ड हस्तगत करण्यात आले आहे.
तक्रारदार मिलिंद पालांडे हे इमिग्रेशन अधिकारी असून, २४ ऑक्टोबर रोजी ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कर्तव्यावर होते. सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास थापा ही मतदार ओळखपत्र आणि बोर्डिंग पाससह इमिग्रेशन तपासणीसाठी त्यांच्या काउंटरवर आली. ती काठमांडू येथून मुंबईत आल्याचे तिच्या बोर्डिंग पासवरून समोर आले.
उत्तरांनी समाधान नाही
नेपाळला कशासाठी गेल्या होत्या, असा प्रश्न पालांडे यांनी तिला विचारताच ती कोणतेही समाधानकारक उत्तर देऊ शकली नाही. तिच्या नावावरून आणि उत्तरांवरून संशय आल्याने पालांडे यांनी तिला पुढील चौकशीसाठी इमिग्रेशन विभागाच्या विशेष तुकडीकडे सोपवले.
दुहेरी नागरिकत्व नाही
भारत आणि नेपाळमध्ये दुहेरी नागरिकत्व घेण्यास मुभा नाही. भारतीय नसलेल्यांना भारतीय मतदार ओळखपत्र, पासपोर्ट किंवा इतर कोणतेही शासकीय
लाभदेणारी कागदपत्रे मिळविण्याचा अधिकार नाही.
मतदार ओळखपत्र वापरत थापा हिने मतदान केल्याचाही संशय असून, याबाबत तपास सुरू आहे.
नेपाळचे नागरिकत्व प्रमाणपत्र सादर करताच पोलखोल
थापाने सांगितले की, ती १९९६ साली पती अर्जुनसिंग थापा याच्यासह भारतात आली आणि कल्याण परिसरात स्थायिक झाली. चौकशीत तिने नेपाळचे नागरिकत्व प्रमाणपत्रही सादर केले, ज्यावर तिचे खरे नाव चंदा रेग्मी असून, ती काठमांडूची रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले.
भारतीय निवडणूक आयोगाला तिने खोटी माहिती सादर करून गैरमार्गाने मतदार ओळखपत्र मिळवल्याचे उघड झाल्यानंतर तिला पुढील कारवाईसाठी सहार पोलिसांकडे सोपविण्यात आले. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.