प्रदूषणावर मात करण्यासाठी उपायांची गरज; पायाभूत सुविधांवर विशेष लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2024 10:52 AM2024-02-08T10:52:10+5:302024-02-08T10:53:22+5:30

वातावरण समर्पित असे अंदाजपत्रक देण्याचा मुंबई महानगरपालिकेचा उपक्रम स्तुत्य आहे.

Need for measures to overcome pollution special focus on infrastructure in mumbai | प्रदूषणावर मात करण्यासाठी उपायांची गरज; पायाभूत सुविधांवर विशेष लक्ष

प्रदूषणावर मात करण्यासाठी उपायांची गरज; पायाभूत सुविधांवर विशेष लक्ष

मुंबई : वातावरण समर्पित असे अंदाजपत्रक देण्याचा मुंबई महानगरपालिकेचा उपक्रम स्तुत्य आहे. मात्र, रस्ते आणि उद्यान विभागांनी पर्यावरणाच्या दृष्टीने शाश्वत अशा बाबींचाअवलंब करण्यात यश मिळविणे हे महत्त्वाचे आव्हान आहे. या अर्थसंकल्पाने पुन्हा एकदा पादचाऱ्यांना दुर्लक्षित करून निराश केले आहे. हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करणाऱ्या नॉन मोटराइज्ड ट्रान्सपोर्ट किंवा पादचारी केंद्रित पायाभूत सुविधांवर विशेष लक्ष या अर्थसंकल्पात दिले गेले नाही.

 महापालिकेच्या अर्थसंकल्पावर हवा प्रदूषणाच्या समस्येवरील तरतुदीच्या अनुषंगाने त्यासंदर्भातील तज्ज्ञ, पर्यावरण कार्यकर्ते यांनी मते नोंदविली आहेत. 

 सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन्स, नगर नियोजनकार, कॉर्पोरेट्स, संशोधक, तज्ज्ञ आणि पर्यावरणवादी अशा विविध नागरिकांचा समूह असलेल्या मुंबई क्लिन एअर ॲक्शन हबच्या सदस्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मुंबई क्लिन एअर ॲक्शन हबच्या सदस्यांचे मत :

क्लायमेट बजेट ही संकल्पना स्वागतार्ह असून, पर्यावरणाच्या दृष्टीने योग्य पाऊल आहे. बेस्टच्या ताफ्यामध्ये ई-बसेसची वाढ करणे हे सार्वजनिक वाहतूक क्षेत्रात अधिक गुंतवणूक करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल महापालिकेने उचलले आहे. मात्र, हवा प्रदूषणावर मात करण्याच्या अनुषंगाने अधिक ठोस आणि दीर्घकालीन उपायांची गरज आहे.- भगवान केसभट, संस्थापक, वातावरण फाउंडेशन

वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी उपयायोजना केल्या जात असल्या, तरी रस्त्याच्या बाजूलाच सुरू असणारे सिमेंट मिक्श्चर्स, कचरा जाळणे सुरू असणे यामुळे त्यामध्ये समस्या निर्माण होत आहेत. पायाभूत सुविधांसह बांधकाम ठिकाणी अद्यापही धुळीची समस्या कायम आहे. हवा प्रदूषणाची माहिती, आकडेवारी सर्वसामान्यांना उपलब्ध करून देण्याची तातडीची गरज आहे. - सुमेरा अब्दुलाली, निमंत्रक, आवाज फाउंडेशन

भारतातील सर्वाधिक श्रीमंत अशा महापालिकेचा दावा आणि सर्वसामान्य नागरिकांना दिसणारे वास्तव यातील विसंगती हा अर्थसंकल्प अधोरेखित करतो. हवा प्रदूषणाचा सामना करण्यात महापालिका प्रगती करत आहे, असे यातून प्रतिपादित होत असले, तरी प्रत्यक्षात अनेक बाबींची पूर्तता करणे बाकी आहे. कचरा जाळणे, कचऱ्याचे वर्गीकरण या बाबींकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.- ऋषी अग्रवाल, संस्थापक-संचालक, मुंबई सस्टेनेबल सेंटर

Read in English

Web Title: Need for measures to overcome pollution special focus on infrastructure in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.