देशातील तरुणांना दिशा देण्याची गरज- उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2020 04:04 IST2020-02-23T04:04:06+5:302020-02-23T04:04:31+5:30
अंजुमन इस्लाम विधि महाविद्यालयाला अंतुलेंचे नाव

देशातील तरुणांना दिशा देण्याची गरज- उद्धव ठाकरे
मुंबई : देशात सध्या अस्थिरता आहे, अस्वस्थता आहे, समोर अंधार पसरलेला आहे. कुठल्या दिशेने जावे हे कळत नाही, अशा वेळी तरुणांना दिशा देण्याची गरज आहे. हे काम शाळा-महाविद्यालयांचे आहे; अन्यथा शाळा-महाविद्यालयांचा काही उपयोग होणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
अंजुमन इस्लाम विधि महाविद्यालयाचे नामकरण बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले विधि महाविद्यालय असे करण्यात आले. अंतुलेंनी त्यांच्या वाग्दत्त वधू नर्गिस अंतुले यांना लिहिलेल्या पत्रांचे संकलन असलेल्या ‘बनाम नर्गिस’ या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी मुंबईत करण्यात आले. त्या वेळी उद्धव ठाकरे बोलत होते. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद व मान्यवर उपस्थित होते. अंतुलेंची कन्या नीलम अंतुले यांनी पुस्तकाचे संकलन केले आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेनाप्रमुखांचा मुलगा अंजुमन इस्लाममध्ये आला याचा आज काही जणांना प्रश्न पडला असेल. काँग्रेससोबत युती झाल्याने माझे धर्मांतर झाल्याचे काहींना वाटते. बॅ. अंतुले आज असते तर त्यांना त्यांच्या मित्राचा मुलगा मुख्यमंत्री झाल्याचे पाहून आनंद झाला असता. सध्या माझ्या वडिलांचे मित्र त्यांच्या मित्राच्या मुलावर जरा जास्तच प्रेम करत आहेत, असे ते पवारांकडे पाहत म्हणाले. येथे जमलेले मराठी असल्याने मराठीतच भाषण करत आहे. मुंबईत सर्वांना एकमेकांची भाषा आलीच पाहिजे. अंतुलेंचे वेगळे रूप पुस्तकाच्या माध्यमातून समोर आले. आदर्श विद्यार्थी घडवण्याची जबाबदारी शाळांची आहे. कुलाब्याचे नामकरण रायगड करण्याचे काम शिवभक्त असलेल्या अंतुलेंनी केले. त्यामुळे अंजुमन इस्लाममध्ये उद्धव ठाकरे कसे, हा प्रश्न पडता कामा नये.
या वेळी शरद पवार यांनी अंतुलेंसोबतच्या आठवणींना उजाळा दिला. अंतुलेंसोबत राजकारणात काम केले. विधानसभेत ते मुख्यमंत्री व मी विरोधी पक्षनेता असताना दररोज वादविवाद व्हायचे. मात्र कामकाज संपल्यानंतर त्यांच्या केबिनमध्ये बसून गप्पा व्हायच्या. बाळासाहेब ठाकरे व अंतुलेंचे संबंध अधिक जवळचे होते. देशाच्या भविष्यासाठी देशात शिस्तीची गरज असल्याचे सांगून ठाकरेंनी आणीबाणीला पाठिंबा दिला होता. गुलाम नबी आझाद म्हणाले, सध्या देशाची परिस्थिती वाईट असून अशी परिस्थिती, असा तणाव यापूर्वी कधी नव्हता. तरुणांनी, विद्यार्थ्यांनी भेदभावाच्या भिंती तोडाव्यात, असे आवाहन त्यांनी केले. अंतुले चांगली व्यक्ती व उत्तम प्रशासक होते. अंजुमन इस्लामचे संस्थापक बद्रुद्दीन तय्यबजी हे काँग्रेसचे अध्यक्ष होते.
या वेळी जावेद अख्तर, डॉ. झहीर काझी, अॅड. मजीद मेमन, संजय राऊत, नवाब मलिक, अशोक चव्हाण, सुनील तटकरे, उदय सामंत, आदिती तटकरे, अरविंद सावंत, भाई जगताप, कपिल पाटील, यामिनी जाधव, रईस शेख व मान्यवर उपस्थित होते.