Join us  

Budget 2019: केंद्रीय अर्थसंकल्प हा 'गोंधळलेला' अर्थसंकल्प; राष्ट्रवादी काँग्रेसची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2019 4:01 PM

देशाचा आज जाहीर झालेला अर्थसंकल्प गोंधळलेला अर्थसंकल्प वाटतो. नक्की कोणत्या क्षेत्राला आपल्याला प्राधान्य द्यायचं आहे याची स्पष्टता या अर्थसंकल्पात नाही

मुंबई - अर्थमंत्री निर्मला सीतारामन या महागाईबद्दल महिलांच्या वेदना समजून घेऊन महागाई कमी करण्यासाठी काहीतरी करतील असे अपेक्षित होते. मात्र महागाई कमी करण्यासाठी या अर्थसंकल्पात काहीही नाही. शिवाय युवा वर्गालाही नाराज करणारा हा अर्थसंकल्प आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी आज जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पावर बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

देशाचा आज जाहीर झालेला अर्थसंकल्प गोंधळलेला अर्थसंकल्प वाटतो. नक्की कोणत्या क्षेत्राला आपल्याला प्राधान्य द्यायचं आहे याची स्पष्टता या अर्थसंकल्पात नाही अशी जोरदार टिका जयंत पाटील यांनी केली.

तसेच आधीच असलेल्या शेतीशी संबंधित योजनांना भरीव निधी देणे या अर्थसंकल्पातून अपेक्षित होते. देशात प्रचंड मोठ्या प्रमाणावर कंपन्या बंद पडत आहेत, त्यावरही कोणताच उपाय या अर्थसंकल्पात केलेला नाही. कालच्या आर्थिक पाहणीत देखील गोलमाल वाटत आहे. किमान अर्थसंकल्पात तरी देशाच्या विकासाच्या इंजिनाला भरीव गती देणारे निर्णय घेतले जातील असे अपेक्षित होते, मात्र तसे काहीही झालेले नाही. उलट या अर्थसंकल्पाने नैसर्गिक विकास प्रक्रियेला खीळ बसणार आहे असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

दरम्यान अर्थमंत्र्यांनी लोकानूनयी निर्णय घ्यायचे नसतात, उलट देशाची अर्थव्यवस्था सुदृढ राहण्यासाठी आवश्यक त्या कठोर उपाययोजना करायच्या असतात मात्र निर्मला सीतारामन यांना हे  माहितीच नाही असे दिसते. काळा पैसा भारतात परत आणण्याची वल्गना करणाऱ्या या सरकारने अर्थ संकल्पामध्ये या विषयाचा नामोल्लेख सुद्धा केलेला नाही असंही जयंत पाटील यांनी सांगितले. 

केंद्रीय अर्थसंकल्प 2019 आज संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला. यामध्ये ग्रामीण भागासह शहरी भागासाठी विविध घोषणा करण्यात आल्या. या अर्थसंकल्पात मोदी सरकारने काही प्रमाणात मध्यमवर्गीयांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला तर श्रीमंतावर अतिरिक्त सरचार्ज आकारण्यात आला. गृह कर्जावरील व्याजावर मिळणारी 2 लाखांची सूट वाढवून साडेतीन लाखांपर्यंत केली आहे. मात्र विरोधकांकडून या अर्थसंकल्पावर टीका होऊ लागली आहे.    

टॅग्स :केंद्रीय अर्थसंकल्प 2019जयंत पाटीलराष्ट्रवादी काँग्रेसनिर्मला सीतारामन