Join us  

बळीराजाच्या मुलांच्या शिक्षणासाठी राष्ट्रवादी काँग्रेस देणार विशेष निधी - शरद पवार 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 1:32 PM

उद्ध्वस्त झालेल्या बळीराजाला सावरण्यासाठी या निधीचा वापर केला जाईल अशी माहिती त्यांनी कार्यकर्त्यांना दिली. 

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी विशेष निधी जमा केला आहे. जवळपास ८० लाखांचा निधीचा धनादेश आज शरद पवारांना सोपविण्यात आला. या निधीचा वापर आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी वापरावा अशी सूचना शरद पवारांनी नेत्यांना केली. 

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, ८० लाखांचा धनादेश दिला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पैसे जमा केले. राष्ट्रवादी पक्षाचा वेलफेअर ट्रस्ट आहे. ज्या कुटुंबाच्या प्रमुखाने शेतीच्या समस्येमुळे आत्महत्या केली. त्या कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी ही रक्कम वापरावी, ही रक्कम फिक्स डिपोझिट ठेऊ, १ लाखांपैकी ५० हजार रक्कम बॅंकेत ठेवायची आणि त्या व्याजातून शिक्षण द्यायचं. उद्ध्वस्त झालेल्या बळीराजाला सावरण्यासाठी या निधीचा वापर केला जाईल अशी माहिती त्यांनी कार्यकर्त्यांना दिली. 

या कार्यक्रमात अनेक नेत्यांनी शरद पवारांबद्दल भाषण केलं. यावेळी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, साहेब नेहमीच आपल्या सहकार्यांच्या पाठिशी उभे राहतात. माझ्यावर हल्ला झाला तेव्हा त्यांनी सर्वतोपरी मदत केली. तेव्हा ते म्हणाले होते की, भुजबळ आपल्याला लढायचे आहे, घाबरायचे नाही. सर्व काही संपलं असं वाटत होतं तेव्हा साहेबांनी पुनर्जन्म दिला. शरद पवारांची प्रतिभा आणि कार्य प्रचंड मोठे आहे. म्हणूनच माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांनी नेहमीच साहेबांचा गौरव केला. वाजपेयी साहेब म्हणायचे की पवार साहब इतने आगे है क्यूंकी उनके साथ प्रतिभा आहे असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत जो प्रश्न आपल्याला समजतही नाही त्या प्रश्नाची सोडवणूक करून शरद पवार मोकळे झालेले असतात. लातूर भूकंप, भूज भूकंप या आपत्तींमध्ये साहेबांनी संवेदनशील परिस्थिती योग्यरित्या हातळली. मुंबई साखळी बॉम्बस्फोटांनंतर त्यांनी काही तासात मुंबईत पूर्ववत केली. स्व. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्राला जर कोणता उत्कृष्ट मुख्यमंत्री लाभला असेल तर ते म्हणजे शरद पवार. आज ही यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची जी वास्तू  उभी आहे त्याची पायाभरणी साहेबांनी केली आहे. सर्वच क्षेत्रात साहेबांनी आपला ठसा उमटवलाय असंही छगन भुजबळांनी सांगितले. 

मी पहिल्यांदा मंत्रालयाची पायरी चढलो ते शरद पवार यांच्यामुळेच. मला पहिल्यांदा साहेबांनी मंत्री बनवले. पवार साहेब काळानुरूप पदाची जबाबदारी देत असतात. त्यांनी मला पक्षाचा मुख्य प्रवक्ता बनवले. आज देशात माझी जी ओळख निर्माण झाली ती शरद पवारांमुळेच आहे. आज देशात प्रचंड वैचारिक मतभेद आहेत. वेगळी विचारधारा आहे. काही लोकांना सुरक्षित वाटत नाही, अशा लोकांना आत्मविश्वास देण्याचे काम शरद पवार करु शकतात . उपेक्षित घटकांना आधार देण्याचे काम पवार साहेब करत आहेत असं आमदार नवाब मलिकांनी सांगितले.  

टॅग्स :शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसशेतकरीछगन भुजबळनवाब मलिक