Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईचा ताबा घेण्यासाठी राष्ट्रवादी लागली कामाला, रोहित यांच्याकडे धुरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2020 07:52 IST

पालिकेसाठी रणनीती

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सर्वात आधी कामाला लागलेला कोणता पक्ष असेल तर तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस. महाविकास आघाडी सरकारची स्थापना झाल्यानंतर मार्च महिन्यातच पदाधिकारी मेळावा घेत राष्ट्रवादीने आपले मनसुबे स्पष्ट केले. मुंबईत आपले संघटन कमकुवत असल्याची जाणीव असलेल्या पक्ष नेतृत्वाने त्याची कसर राज्यातील सत्तेच्या जोरावर भरून काढण्याचाच जणू चंग बांधला आहे. 

मुंबईत राष्ट्रवादीची ताकद वाढायला हवी, अशी भूमिका स्वतः शरद पवार यांनी अनेक वेळा कार्यकर्त्यांसमोर बोलताना मांडली होती. आवाज कोणाचा, या घोषणेला राष्ट्रवादीचा, असे उत्तर यायला हवे, अशी भावनाही त्यांनी काही वर्षांपूर्वी बोलून दाखविली होती. मात्र, आधीच मर्यादित ताकद असलेल्या राष्ट्रवादीला गटातटाच्या राजकारणातून बाहेर येता आले नाही. एकेकाळी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेले सचिन अहिर निवडणुकीपूर्वी शिवसेनेत दाखल झाले. तर, संजय दिना पाटील यांनी आपले तळ्यातमळ्यात असतानाही नवाब मलिक यांच्याशी भिडायला मागेपुढे पाहिले नव्हते. तर, उत्तर मुंबईत एकहाती राष्ट्रवादीचा झेंडा नेणारे प्रकाश सुर्वे यांनी शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेत दुसऱ्यांदा आमदारकीही मिळवली. विविध पक्षांतून आलेल्या नेत्यांची मांदियाळी म्हणजे मुंबईतील राष्ट्रवादी, असे चित्र आहे.  आपापल्या भागात, क्षेत्रात वर्चस्व असणाऱ्या या नेत्यांना पक्ष म्हणून कधीच एकत्रित छाप टाकता आली नाही. त्यामुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून लोकप्रिय कामे हाती घेतली जातील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. या माध्यमातून पक्षाचा जनाधार वाढविण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीने चालविला आहे. 

राज्यातील सत्तेचा वापर करून विस्तार करण्याची राष्ट्रवादीची योजना कितपत यशस्वी होणार, याबाबत तर्कवितर्क आहेत.  सध्या, अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्याकडे मुंबई अध्यक्षपद आहे.  मंत्रिपद आणि अध्यक्षपदाचा योग्य वापर करण्याचा धोरणाला कितपत पाठिंबा मिळतो, हे आगामी काळात स्पष्ट होईल. मलिक यांनी मेळावा घेत धडाक्यात केलेली सुरुवात लाॅकडाऊनमुळे थांबवावी लागली. मात्र सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्याकडे पालिका निवडणुकीची जबाबदारी देण्यात आल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे धडाक्यात झालेली सुरुवात शह-काटशहाच्या राजकारणात तर रुतणार नाही ना, अशी शंका आता पक्षातूनच व्यक्त केली जात आहे. जेमतेम ९ नगरसेवक असणाऱ्या राष्ट्रवादीला मुंबईत सर्वात मोठा पक्ष बनविण्याचे लक्ष्य आजच्या घडीला तर कष्टप्रदच मानले जात आहे.

रोहित यांच्याकडे धुरानेत्यांमधील सत्तासंघर्षाचे मुंबईत पडसाद उमटू लागले आहेत. मलिक यांनी मार्च महिन्यात घेतलेल्या मेळाव्यावर अजित पवारांची छाप होती. आता मात्र सुप्रिया सुळे, रोहित पवार यांच्याकडे निवडणुकीची जबाबदारी देण्यात आल्याच्या चर्चा सुरू आहेत

टॅग्स :राष्ट्रवादी काँग्रेसमुंबईरोहित पवारसुप्रिया सुळे