Join us

दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंवर आरोप,  रोहित पवारांचे मोठे विधान; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 13:01 IST

Disha Salian Case: एखादी व्यक्ती न्याय मिळण्यासाठी न्यायालयात गेली असेल, तर न्याय मिळायला हवा, अशी भूमिका आमची आहे, असे रोहित पवारांनी म्हटले आहे.

Disha Salian Case: सुशांत सिंग राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियन मृत्यू प्रकरण तब्बल पाच वर्षानंतर आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. दिशाच्या वडिलांनी मुलीच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची विनंती केली आहे. या प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याची मागणी सतीश सालियन यांनी याचिकेद्वारे मुंबई उच्च न्यायालयाकडे केली आहे. या याचिकेत दिशा सालियनच्या वडिलांनी ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे. यावरून आता राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत असून, महाविकास आघाडीसह शिंदे गटाचे काही नेते आदित्य ठाकरेंचा बचाव करताना पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी यावर भाष्य केले. 

मीडियाशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, एखादी व्यक्ती न्याय मिळण्यासाठी न्यायालयात गेली असेल, तर न्याय मिळायला हवा, अशी भूमिका आम्हा सगळ्यांना वाटते. उच्च न्यायालय या प्रकरणात काय करते, ते पाहावे लागेल. आदित्य ठाकरे यांचे नाव घेतले जात आहे. परंतु, यात काही तथ्य आहे, असे मला वाटत नाही. आदित्य ठाकरे आणि या प्रकरणाचे काही देणे-घेणे नाही. पण ठीक आहे. नाव घेतले आहे, तर त्यावर आता शहानिशा केली जाईल. माझे एकच म्हणणे आहे की, भाजपा याबाबतीत आता राजकारण करेल, असा दावा रोहित पवारांनी केला. 

भाजपाने या प्रकरणाचा वापर त्या निवडणुकांमध्ये केला होता

चार वर्षांपूर्वी सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येचे प्रकरण समोर आले होते, तेव्हा बिहारच्या निवडणुका होत्या. तेव्हा भाजपाने या प्रकरणाचा वापर त्या निवडणुकांमध्ये केला होता. बिहार निवडणुका झाल्यावर सगळे जण सुशांत सिंह राजपूत प्रकरण विसरून गेले. गेल्या तीन-चार वर्षांत भाजपाच्याच मित्रपक्षांचे सरकार असताना, कोणी काही केले नाही. परंतु, आता सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियन प्रकरण भाजपा नक्कीच लावून धरेल, असे आम्हाला वाटते. कारण पुन्हा बिहार निवडणुका आल्या आहेत.  तसेच मुंबई महापालिका निवडणुका आहेत. औरंगजेब प्रकरणाचा भाजपाला आणि त्यांच्या मित्रपक्षांना जास्त फायदा झालेला नाही, असे दिसते. त्यामुळे सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियन यांचे प्रकरण पुढे येईल, असे मला वाटते, असे रोहित पवार यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, दिशा सालियन मृत्यू प्रकरण भाजपा ज्या पद्धतीने हाताळेल, त्यामध्ये मुंबई महापालिका निवडणुकीचे राजकारण केले जाईल. भाजपाला फक्त कोणत्या न कोणत्या मुद्यांवरून राजकारण पाहिजे. दिशा सालियन प्रकरणाच्या माध्यमातून आपण निवडणुकीत मुद्दा करू शकतो का? मुंबईच्या महापालिका निवडणुकीत आदित्य ठाकरेंना अडचणीत आणू शकतो का? फक्त वातावरण निर्मीतीसाठी भाजपाला वाटत असेल की, दिशा सालियन प्रकरण फायद्याच्या दृष्टीकोनातून चांगले दिसते, असे रोहित पवार म्हणाले.

 

टॅग्स :आदित्य ठाकरेरोहित पवारसुशांत सिंग रजपूत