NCP SP Group MP Supriya Sule News: ठाकरे कुटुंब आणि पवार कुटुंबाचे सहा दशकांचे प्रेमाचे ऋणानुबंध आहेत. बाळासाहेब ठाकरे, मीनाताई ठाकरे आणि माझ्या आई-वडिलांचे अतिशय प्रेमाचे संबंध. त्यांनी एकमेकांच्या विरोधात अगदी टोकाची राजकीय भूमिका घेतली. परंतु, कौटुंबिक संबंध दोन्ही बाजूंनी जपले गेले. तेच संस्कार माझ्यावर झालेले आहेत. त्यामुळे अर्थातच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघेही माझ्यासाठी भावासमान आहेत. ते दोघेही एकत्र येत असतील, तर महाराष्ट्राच्या हितासाठी दोघेही मनाचा मोठेपणा दाखवत आहे, हे कौतुकास्पद आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे यांनी विविध विषयांवर स्पष्ट शब्दांत भाष्य केले. यावेळी ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू असून, यासंदर्भात सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारण्यात आला. महाराष्ट्र दिनानिमित्त हुतात्मा चौक येथे विविध पक्षाच्या राजकीय नेत्यांनी येऊन हुतात्म्यांना अभिवादन केले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे हुतात्मा चौकात हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आले होते. याचवेळी सुप्रिया सुळेही तेथे पोहोचल्या. यावेळी राज ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांनी एकमेकांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये पाच ते सात मिनिटे चर्चा झाली. यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांना ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली.
मी कसा सल्ला देणार? हे सगळे माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत
माझे कौटुंबिक संबंध आहेत. एखादे कुटुंब एकत्र येत असेल आणि राज्याचेही चांगले होणार असेल, तर कोणीही व्यक्ती त्याचे स्वागतच करेल, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. यावर, राज ठाकरे यांच्या भेट झाली, तेव्हा एकत्र येण्याबाबत त्यांना सल्ला दिला का, अशी विचारणा पत्रकारांनी केली. यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी कसा सल्ला देणार? हे सगळे माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत. मी सर्वांशी बोलते. समोरचा बोलला, नाही बोलला, तरी मी सगळ्यांशी संवाद साधते. कारण संवाद असलाच पाहिजे.
दरम्यान, जातनिहाय जनगणना करण्याची मागणी आपण केली होती. ती उशिरा का होईना केंद्र सरकारने मान्य केली. त्याचे मी मनापासून स्वागत करते. तसेच पहलगाम हल्ल्याबद्दल प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत कोणतीही विरोधी भूमिका घेणार नाही. आम्ही सरकारला याबाबत शब्द दिला आहे. टीका करायला भरपूर संधी आहे. संसदेत या विषयावर ताकदीने बोलेल. पण आता आठ ते दहा दिवस अत्यंत जपून व्यक्त करणार आहे. संसदेत सर्व पक्षांना एकत्र बोलवा. त्यानंतर जगाला आम्ही एक आहोत, असा संदेश दिला पाहिजे, असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी केले.