NCP SP Group Jayant Patil News: महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. विविध मुद्द्यांवरून महाविकास आघाडीसह विरोधक सत्ताधारी महायुतीवर टीका करताना पाहायला मिळत आहे. वेगवेगळे मुद्दे घेऊन कामकाज सुरू व्हायच्या आधी विधिमंडळांच्या पायऱ्यांवर आंदोलन केले जात असल्याचे दिसत आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सदस्य जयंत पाटील यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भात एक महत्त्वाची मागणी विधानसभेत केली.
वाळवा तालुक्यात द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, त्यांच्या नुकसान भरपाईबाबत कोणताही विचार होत नाही त्यामुळे सभागृहाचे कामकाज बाजूला ठेवून वाळवा तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीवर चर्चा करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभेत केली.
याबाबत विस्तृत माहिती देताना जयंत पाटील म्हणाले की, २०२३-२४ साली ऐन पीक छाटणी घेतलेली असताना माझ्या वाळवा आणि आजूबाजूच्या परिसरात अवकाळी पाऊस झाला आणि या अवकाळी पावसाने द्राक्षबागेचे प्रचंड नुकसान झाले. जवळपास २५० हेक्टर बाग बाधित झाली आहे. शासनाने याचे पंचनामे तर केले पण अद्याप कोणतीही नुकसानभरपाई मिळाली नाही. यंदाही मे महिन्यातच पाऊस सुरू झाल्याने द्राक्षबागांची काडीच तयार झाली नाही. त्यामुळे यंदा हजारो एकर द्राक्ष बागांना घड पडणे शक्य नाही. त्यामुळे शेतकरी आणखी अडचणीत सापडला आहे, असे ते म्हणाले.
हा गंभीर प्रश्न उपस्थित करत त्यांनी शासनाला मागणी केली की यात लक्ष घालून मागील नुकसान भरपाई तर द्यावीच त्याशिवाय यंदाचे ही पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी अशीही मागणी त्यांनी केली.