NCP SP Group Jayant Patil News: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी आज विधानसभेत स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमासाठी निधी वाढवून देण्यात यावे अशी मागणी विधानसभेत केली.
स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची पुण्यतिथी तिथीप्रमाणे येत्या २९ मार्च २०२५ रोजी येत आहे. यावर जयंत पाटील यांनी सभागृहात लक्ष वेधले. ते म्हणाले की, सध्याचे वातावरण पाहता, लोखो शंभू प्रेमी तुळापूर येथील शंभूराजांच्या स्मारक परिसरात जमण्याची शक्यता आहे. पुण्यतिथी कार्यक्रमासाठी शासनाने फार तुटपुंजा निधी दिला आहे. आमची मागणी आहे की सर्व शंभूभक्त, शंभूप्रेमींची भावना लक्षात घेता, पुण्यतिथी कार्यक्रमाची व्याप्ती लक्षात घेता शासनाने या निधीत वाढ करावी. हा निधी ३० ते ४० लाख रुपयांचा करावा, असे ते म्हणाले. तसेच दरवर्षी या कार्यक्रमासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, असेही त्यांनी सांगितले.
पुण्यतिथी कार्यक्रमासाठी निधी कमी पडणार नाही
जयंत पाटील यांनी केलेल्या मागणीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, पुण्यतिथी कार्यक्रमासाठी निधी कमी पडणार नाही असे आश्वासन सभागृहात दिले.