NCP SP Group Jayant Patil: विधानसभेत विरोधी पक्षाच्या २९३ अन्वये प्रस्तावावर चर्चा पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी सरकारच्या चुकीच्या धोरणांवर बोट ठेवत जोरदार निशाणा साधला. बाहेरच्या देशांनी सुनीता विल्यम्स यांना पृथ्वीवर परत आणले. जग अवकाशात पोहोचले आहे आणि आपण एका कबरीच्या मागे लागलो आहोत, असा खोचक टोला जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.
जयंत पाटील म्हणाले की, आधुनिक पद्धतीने शेती करणारे राज्य शासनाचा युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त कैलास नागरे या आपल्या शेतकऱ्याने आत्महत्या केली. शिवारात कायमच पाण्याची चणचण होती ही समस्या दूर करण्यासाठी त्यांनी परिसरातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन एक आंदोलन उभारले होते. ओवर फ्लो झालेल्या खडकपूर्णा धरणातून पाणी सोडावे अशी त्यांची मागणी होती. तसे लेखी आश्वासनही अधिकाऱ्यांनी दिले होते. परंतु मार्च महिना उजाडला तरीही मागणी मान्य न झाल्याने अखेर त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. हे अतिशय दुर्दैवी आहे. कारण शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी राज्यकर्ते कमी पडत आहेत. सातत्याने तोट्याची शेती आणि त्यातून होणारी आर्थिक कुचंबणा हे आत्महत्यांचे मूळ कारण आहे. मागच्या वर्षभरात मराठवाडा आणि विदर्भात सुमारे २७०६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. योग्य सिंचन व्यवस्था नाही, वीज पुरवठा नाही, जीएसटीचा अतिरिक्त भार त्यात सावकारी बेहिशोबी कर्जाचा पाश यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. सत्ता आल्या गेल्या मात्र शेतकऱ्यांना न्याय अद्याप मिळालेला नाही, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
खऱ्या अर्थाने ही मुंबई घडवली त्यांना मुंबईत राहण्याची भ्रांती करावी लागते
ज्यांनी खऱ्या अर्थाने ही मुंबई घडवली त्यांना मुंबईत राहण्याची भ्रांती करावी लागते. कारण त्यांच्या घरांवर परप्रांतीयांचा डोळा आहे. मुंबईत २००-३०० अमराठी विकासक आहेत. त्या तुलनेत मराठी विकासक फार कमी आहे. हे परप्रांतीय विकासक सहाव्या मजल्यावर बसून मुंबईतील इंच न इंच जमिनीची सौदेबाजी करतात. काही एस आर ए प्रकल्प १५ वर्षांपासून प्रलंबित आहेत. ट्रान्झिट कॅम्पमध्ये लोकांची गैरसोय झाली आहे. विकासकांनी त्यांना वाऱ्यावर सोडले आहे. जाणून-बुजून प्रकल्प प्रलंबित ठेवणाऱ्या विकासकांवर कारवाई का होत नाही? त्यांच्यावर फौजदारी होणे दाखल होणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा व्यक्त करत, काळा चौकीत राहणाऱ्या युवकाला चुकीच्या मार्गाने येणाऱ्या शिवशाही बसने चिरडले, त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्या पत्नीच्या पदरी दीड वर्षाचे मूल आहे. या कुटुंबाला नुकसान भरपाई झालीच पाहिजे, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली.
दरम्यान, भारताला मोठ्या ऐतिहासिक परंपरा आहे. तंत्रज्ञानाचा वारसा आहे. आपली अवस्था वाईट का झाली? तर आपण शिक्षणाचा प्रसार केला नाही, विज्ञान चमत्काराला जोडलं, देवाकडून दैवाकडे गेलो, श्रद्धेपेक्षा अंधश्रद्धेचे पारडे जड झाले. कर्मकांडांना महत्त्व दिले. जातिभेद सोबतीला घेतले. यामुळे समाजाची वैचारिक क्षमता कमी झाली. याचा परिणाम म्हणून मूठभर परकीय आक्रमणांनी आपल्यावर सत्ता गाजवली. स्वातंत्र्यानंतर गोष्टी बदलल्या. मात्र आता जग तिथे अवकाशात पोहोचलेले असताना आपण इथे कबरीच्या मागे लागलो आहेत. हे दुर्दैव आहे. ही मानसिकता बदलण्याची गरज आहे, असे जयंत पाटील म्हणाले.