Join us  

‘अजित पवारांबद्दल राष्ट्रवादीने निर्णय घ्यावा’

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 4:27 AM

मंत्रिमंडळ, खातेवाटपाची चर्चा होणे स्वाभाविक आहे.

मुंबई : अजित पवार यांना मंत्रिमंडळात घ्यायचे की नाही याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घ्यायचा आहे. त्यावर आम्ही भाष्य करणे योग्य नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांना सांगितले.

थोरात यांना मंत्रालयातील पहिल्या मजल्यावरील माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचे दालन मिळाले आहे. तेथे बसून त्यांनी आज कामकाजास सुरुवात केली. फडणवीस जे बोलतात ते होत नाही, विरोधी पक्ष नेताच निवडणुकीनंतर दिसणार नाही म्हणणाऱ्या फडणवीस यांना स्वत:च विरोधी पक्ष नेता व्हावे लागले. त्याबद्दल आपण आधीच बोललो होतो. नारायण राणे यांचा स्वभाव महाराष्ट्राला माहिती आहे, त्याबद्दल मी जास्त काय बोलणार, असेही ते एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.

मंत्रिमंडळ, खातेवाटपाची चर्चा होणे स्वाभाविक आहे. आज-उद्या ते होईल असे वाटते, असे सांगून थोरात म्हणाले, खातेवाटप झाल्यानंतर त्या खात्याचे काम करता येईल. पाच वर्षे सरकार चालवायचे आहे. त्यामुळे खातेवाटपासाठी वेळ लागणे स्वाभाविक आहे. आढावा बैठकीत मुख्यमंत्री सगळ्यांना सोबत घेऊन प्रत्येक प्रश्नावर चर्चा करीत आहेत. त्यांना सगळे विषय माहिती आहेत. कृषी विभागाची चर्चा चालू असताना ते नेमके प्रश्न विचारत होते. त्यांच्याशी मंत्री म्हणून काम करण्याचा योग पहिल्यांदाच आला आहे. पण त्यांची काम करण्याची भूमिका प्रामाणिक आहे, असेही ते म्हणाले.

अशोक चव्हाण यांनी काही वेगळी विधाने केली आहेत, त्याबद्दल तुमचे मत काय? असे विचारले असता थोरात म्हणाले, ते पक्षाचे नेते आहेत, प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनीही काम केले आहे, त्यांनी काय बोलावे आणि काय नाही हे मी कसे काय सांगणार?

टॅग्स :अजित पवारबाळासाहेब थोरातराष्ट्रवादी काँग्रेसशिवसेनाकाँग्रेस