“सकाळी दहाच्या भोंग्याबद्दल तक्रार, सरकारने विचार करावा”; विधानसभेत सत्ताधाऱ्यांची टोलेबाजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 16:23 IST2025-07-11T16:19:55+5:302025-07-11T16:23:21+5:30
Vidhan Sabha News: विधानसभेत लक्षवेधीवर चर्चा सुरू असताना संजय राऊतांचे नाव न घेता सत्ताधारी बाकांवरील सदस्यांनी टोलेबाजी केली.

“सकाळी दहाच्या भोंग्याबद्दल तक्रार, सरकारने विचार करावा”; विधानसभेत सत्ताधाऱ्यांची टोलेबाजी
Vidhan Sabha News: महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. विविध प्रश्न विरोधकांकडून मांडले जात असून, सत्ताधारी या प्रश्नांचे मुद्द्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न करत असतात. याचसोबत विधानसभेत विविध मुद्द्यांवरून गमती जमती घडत असतात. टोलेबाजी केली जाते. लाऊड स्पिकर, भोंग्यांच्या आवाजासंदर्भात विधासभेत लक्षवेधी मांडण्यात आली होती. या लक्षवेधीवरील चर्चा सुरू असताना सत्ताधारी बाकांवरील सदस्यांनी अप्रत्यक्षपणे टोलेबाजी केली.
लाऊड स्पिकर, भोंग्यांच्या आवाजामुळे ध्वनी प्रदूषण होत असून त्या ठिकाणच्या परिसरातील रहिवाशांना त्रास सहन करावा लागतो. बेकायदेशीर लाऊड स्पिकर आणि भोंग्यांच्या विरोधात पोलिसांनी तक्रारीची वाट न पाहता स्वतःहून कारवाई करावी, असा मुद्दा भाजपा सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केला. या लक्षवेधीवर चर्चा सुरू असताना ठाकरे गटाचे सदस्य आदित्य ठाकरे यांनीही उपप्रश्न विचारला. या चर्चेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले.
सकाळी दहाच्या भोंग्याबद्दल आमची तक्रार, सरकारने विचार
ही चर्चा सुरू असतानाच मंत्री अनिल पाटील यांनी सकाळच्या दहाच्या भोंग्याचा विषय काढला. अनिल पाटील म्हणाले की, सकाळच्या दहाच्या भोंग्याबद्दल आमची तक्रार आहे. त्याबद्दल सरकारने विचार करावा, अशी माझी मागणी आहे. अनिल पाटील यांनी सदर प्रश्न विचारताच सत्ताधारी बाकावर एकच हशा पिकला. अनिल पाटील यांच्या प्रश्नाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिश्किलपणे उत्तर दिले. या विषयातील अडचण अशी आहे की, ध्वनी प्रदूषणाबद्दल आपल्याकडे कायदा आहे. पण विचाराच्या प्रदूषणाबद्दल आपल्याकडे अजून कायदा व्हायचा आहे. तो कायदा झाला की, आपण विचार करू, असा चिमटा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढला.
दरम्यान, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दहिहंडी यादरम्यान स्थानिक पोलिसांकडून लाऊड स्पिकरवर कारवाई केली जाते. सार्वजनिक उत्सव मंडळाला पोलिसांनी त्रास देऊ नये, असे निर्देश द्यावेत. पोलिसांनी परवानगी असूनही मंडळांना त्रास दिल्यास त्यांच्यावर कारवाई करावी, असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.