मुंबई - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि प्रफुल पटेल यांनी वर्षा बंगल्यावर जात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्रिपद द्यावे अशी मागणी नेत्यांकडून करण्यात येणार असल्याचं पुढे येत आहे. त्याशिवाय अजित पवारांकडील खाती राष्ट्रवादीकडेच राहावी यासाठी या नेत्यांचा प्रयत्न आहे.
अजित पवारांच्या आकस्मिक निधनाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली आहे. अजित पवार वगळता राष्ट्रवादीतील इतर नेते हे त्यांच्या जिल्ह्यापुरते मर्यादित असल्याने राज्यभर लोकनेता म्हणून असा कुठलाही चेहरा पक्षाकडे नाही. त्यात अजित पवारांचे चिरंजीव जय आणि पार्थ हे राजकारणात फारसे सक्रीय नाहीत. त्यात राष्ट्रवादीतील या नेत्यांपैकी कुणाला नेतृत्व दिले तर त्यावरून पक्षातील गटबाजी उफाळून येऊ शकते. त्यामुळे सध्याच्या घडीला सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा आहे.
सुनेत्रा पवार या अजित पवारांच्या पत्नी असून मागील काही काळापासून त्या राजकारणात सक्रीय आहेत. लोकसभेतील पराभवानंतर सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादीकडून राज्यसभेवर खासदार म्हणून संधी देण्यात आली. गेल्या वर्षभरापासून सुनेत्रा पवार खासदार म्हणून काम करत आहेत. त्यात अजित पवार यांच्या जाण्याने नेतृत्वाची जी पोकळी निर्माण झाली आहे ती भरून काढण्यासाठी सुनेत्रा पवारांचे नाव पुढे येत आहे. मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करावे अशी मागणी केली. त्याशिवाय पक्षातील इतर नेत्यांमध्येही सुनेत्रा पवारांनी सुत्रे हाती घ्यावीत अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि प्रफुल पटेल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.
अर्थसंकल्प देवेंद्र फडणवीस मांडणार?
राज्यात पुढील काळात अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे. यात अर्थसंकल्प कोण मांडणार अशी चर्चा सुरू झाली. आतापर्यंत सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प अजित पवारांनी मांडला आहे. अजित पवार महायुतीत सहभागी झाले तेव्हा त्यांच्याकडे अर्थ खाते देण्यात आले. मात्र आता अजित पवारांच्या निधनानंतर अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांडण्याची शक्यता आहे.
Web Summary : Following Ajit Pawar's death, NCP leaders proposed Sunetra Pawar as Deputy CM to Fadnavis. They also seek to retain Ajit Pawar's portfolios within the party, amid leadership void and potential infighting.
Web Summary : अजित पवार के निधन के बाद, राकांपा नेताओं ने फडणवीस से मिलकर सुनेत्रा पवार को उपमुख्यमंत्री बनाने का प्रस्ताव रखा। वे नेतृत्व शून्य और संभावित गुटीय कलह के बीच, अजित पवार के विभागों को पार्टी के भीतर बनाए रखना चाहते हैं।