Join us  

मेट्रो कारशेडसाठी 'या' जागेचा विचार करावा; नवाब मलिक यांनी सुचवला पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2019 3:45 PM

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आरेतील वृक्षतोडीला तात्काळ स्थगिती देण्याचा निर्णय घेतला होता.

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आरेतील वृक्षतोडीला तात्काळ स्थगिती देण्याचा निर्णय घेतला होता. आरेतील वृक्षतोडीवर तात्काळ निर्णय घेतला असून झाडांची कत्तल चालणार नाही. मेट्रोच्या कारशेडचं काम सुरु राहिल. पण, आरेतील वृक्षतोडीला स्थगिती देण्यात आल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं होतं. त्यातच मेट्रोच्या कारशेडसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी आज विधानसभेत पर्यायी जागा सुचवली आहे.

नवाब मलिक म्हणाले की, मेट्रोच्या कारशेडसाठी आरेच्या बाजूलाच असलेल्या राज्या राखीव पोलीस दलाच्या परेड मैदानाची जागेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विचार कराव अशी भूमिका त्यांनी आज विधानसभेच्या विशेष अधिवेशनात मांडली. तसेच आरे मधील वृक्षतोडीविरोधात आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ते तात्काळ मागे घेण्याची विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

 शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. गुरूवारी शिवाजी पार्कवर हा शपथविधी सोहळा पार पडला. या पार्श्वभूमीवर दादरमधील शिवसेना भवनाला रोषणाई करण्यात आली आहे. यातच मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेना भवनासमोर नागरिकांनी पोस्टर झळकावून उद्धव ठाकरेंना एका आश्वासनाची आठवण करुन दिली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर आरोमधील आता जेवढी झाडं राहिली आहेत, ती तशीच राहतील. या झाडांपैकी एकही झाड पडणार नसून त्या झाडांचं पानही कुणी तोडणार नाही, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी आरे कारशेडसाठीच्या जंगलतोडीला स्थगिती दिल्याची त्यांनी घोषणा केली.

मेट्रो-३ प्रकल्पासाठी आरे कॉलनीतील झाडे तोडण्यात आली. त्यानंतर सत्ता आल्यानंतर आरेतील जंगलामध्ये असलेल्या झाडांवर कुऱ्हाड चालवणाऱ्यांना बघू असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला होता. तसेच, सत्तेत आल्यानंतर आरेला जंगल करू असे आश्वासन शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी दिले होते. त्याचीच आठवण उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर नागरिकांनी करुन दिली. यावेळी 'आरे बचाव' असे पोस्टर हातात घेऊन शिवसेना भवनाबाहेर नागरिकांनी घोषणाबाजी केली होती. 

टॅग्स :आरेमेट्रोउद्धव ठाकरेनवाब मलिकजितेंद्र आव्हाड