Join us

'आहात तिथे सुखी राहा, खाजवून खरूज काढू नका'; जितेंद्र आव्हाडांनी दीपक केसरकरांना सुनावलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 19:16 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शिंदे गटातील आमदार दीपक केसरकर यांच्यावर टीका केली आहे.

मुंबई- शिवसेना आजवर ज्या ज्या वेळी फुटली त्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचाच हात होता, असा दावा शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी केला आहे. तसेच राष्ट्रवादीकडून राज्यात कसं शिवसेनेला संपवण्याचं कारस्थान सुरू आहे याची माहिती दीपक केसरकरांनी दिली.

आपला पक्ष मोठा व्हावा तो सत्तेवर यावा ही पवाराचा इच्छा असणं स्वाभाविक आहे. पण बाळासाहेबांना कधीच राष्ट्रवादीचा विचारधारा पटलेली नाही. त्यामुळे सामान्य शिवसैनिक राष्ट्रवादीसोबत जाणार नाही. ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रात शिवसेना फुटलेली आहे त्यामध्ये शरद पवारांचाच हात राहिला आहे ते त्यांचं वैशिष्ट्य आहे, असा घणाघात दीपक केसरकर यांनी केला. 

दीपक केसरकरांच्या या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे. अहो केसरकर किती बोलता शरद पवारांविरुद्ध... एकेकाळी शरद पवारांनी अनेकांना नाराज करत तुम्हाला सिंधुदुर्ग आणि गोव्यात हाताला धरून फिरवले, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. तसेच २०१४ला मीच साहेबांचा निरोप घेऊन आलो होतो. जिथे आहात तिथे सुखी राहा, असं म्हणत खाजवून खरूज काढू नका, असा सल्लाही जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.

दरम्यान, बाळासाहेब जिवंत होते त्यावेळी शिवसेना फोडून शरद पवारांनी त्यांना यातना का दिल्या? याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे, असं केसरकर म्हणाले. जनतेला कुणीच गृहीत धरू नये हे शरद पवारांना चांगलं माहित आहे. त्यांना जनतेची नस माहित आहे म्हणूनच ते शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र यायला हवी असं म्हणाले. नाहीतर राष्ट्रवादीनं एकट्यानं निवडून यावं, कारण त्यांना गेल्या अडीच वर्षात सत्तेचं टॉनिक मिळालं आहे. मग स्वबळावर निवडून आणा ना, असा टोला दीपक केसरकर यांनी लगावला.

शरद पवारांमुळे शिवसेना प्रत्येकवेळी फुटली

राष्ट्रवादीच्या नेत्यांची प्रत्येक ठिकाणची भाषणं पाहा. त्यांना राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करायचा आहे याचंच ते प्लानिंग गेले अडीच वर्ष करत आहेत आणि तसं करण्यासाठी शिवसैनिक जर पालखीचे भोई ठरणार असतील तर ते मान्य आहे का? याचा विचार शिवसैनिकांनी करायला हवा, असंही केसरकर म्हणाले. शिवसेना जेव्हा जेव्हा फुटली यामागे शरद पवारांचाच हात आहे आणि याचा मी साक्षीदार असल्याचं सांगताना केसरकर यांनी महत्वाची माहिती दिली.

टॅग्स :जितेंद्र आव्हाडदीपक केसरकर शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसशिवसेना