Join us  

"फडणवीस महाराष्ट्राला लागलेला महारोग;... पण तसं म्हणणार नाही"- गोटेंचं वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 8:48 PM

अनिल गोटे म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांनी माझ्याशी केलेली धोकेबाजी, विश्वासघात जगजाहीर आहे.

मुंबई: धनगर समाजाच्या आरक्षणावरून ठाकरे सरकार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत असल्याचे वादग्रस्त विधान केले होते. गोपीचंद पडळकर यांच्या या विधानाचे पडसाद आता राज्यभर उमटत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल गोटे यांनी देखील आता शरद पवारांवरील विधानावरुन गोपीचंद पडळकर यांच्यासह माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

अनिल गोटे म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांनी माझ्याशी केलेली धोकेबाजी, विश्वासघात जगजाहीर आहे. पण एकही धनगर विधानसभेत घेऊ नये यासाठी केलेली कारस्थाने, डावपेच आणि प्रसंगी विरोधकांना बळ देण्याचे त्यांनी केलेले उद्योग मी जाणून आहे. माझ्या मतदारसंघात 'मुसलमान आला तरी चालेल, पण अनिल गोटे येता कामा नये' यासाठी पैशांचा महापूर आला होता, असं अनिल गोटे यांनी सांगितले. तसेच मी संतापामध्ये देवेंद्र फडणवीस म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेला महारोग आहे, पण मी असं म्हणणार नाही, असं वादग्रस्त वक्तव्य देखील अनिल गोटे यांनी केले आहे. गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर अनिल गोटे यांनी एक पत्रक जारी करत देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. 

गोपीचंद पडळकरांच्या वादग्रस्त विधानावर शरद पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका करताना अनिल गोटे म्हणाले की, आमदार होऊन आठ दिवस झालेत, तोवर पडळकरांना नशा चढली आहे. भारतीय जनता पार्टी आणि पक्षातील उच्चवर्णियांच्या संकुचिपणाची त्यांना अजून पुसटशी ओळखही नाही, असं गोटे यांनी म्हटलं आहे. मी अनेकदा शरद पवारांवर टीका केली. गेली 10 महिने मी त्यांच्याबरोबर काम करत आहे. दिलेल्या शब्दाला जागणे, मनात द्वेष न बाळगणे ही त्यांची विशेषता. शरद पवारांवर प्रेम करणारांची संख्या जेवढी राष्ट्रवादीत आहे त्यापेक्षा दुप्पट लोक अन्य पक्षातील आहेत, जे त्यांच्यावर प्रेम करतात, असं अनिल गोटे यांनी पुढे सांगितले.

पडळकरांनी शरद पवारांना कोरोनाची उपमा दिली. यावरुन त्यांची राजकीय पात्रता, मनाची क्षुद्रता आणि विचारांची पातळी लक्षात येते. पवारांचे वय, अनुभव अन् राजकीय कारकीर्द पाहता पडळकर हे डासाएवढेही नाहीत. डास मारायला कुणी बंदूक वापरत नाही. त्याला हीटचा फवारा पुरेसा असतो, असं गोटे यांनी म्हटलं आहे.  तसेच प्रारंभीच्या काळात एकनाथ खडसे यांच्या विरुद्ध कारस्थान यांनीच रचल्याचा गौप्यस्फोट देखील अनिल गोटे यांनी केला आहे.

गोपीचंद पडळकर यांनी नक्की काय विधान केलं-  

शरद पवारांकडे कोणतीही विचारधारा, अजेंडा, व्हिजन नाही. छोट्या छोट्या समूह घटकांना भडकवायचं, त्यांना आपल्या बाजूला करायचं आणि त्यांच्यावरच अन्याय करण्याची त्यांची भूमिका आहे. धनगर आरक्षणाच्या बाबतीत ते सकारात्मक असतील असं मला वाटत नाही. त्यांना फक्त धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नाचं राजकारण करायचं आहे, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं धनगरांसाठी पॅकेज जाहीर केलं होतं. मात्र विश्वासघातामुळे सरकार पडल्यानं त्यावर कार्यवाही होऊ शकली नाही. पण या सरकारनं त्या पॅकेजमधील एक रुपयादेखील दिला नाही. फडणवीसांनी धनगरांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये पाच वसतिगृह, यूपीएससी, एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांबद्दलच्या निर्णयाचा समावेश आहे. मात्र यासाठी सध्याच्या सरकारनं एक रुपयाही दिला नाही. विधिमंडळाच्या अधिवेशनात यावर आम्हाला बोलावं लागेल, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत असल्याचे विधान गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे.

अन्य महत्वाच्या बातम्या- 

पडळकरांना नशा चढलीय, पवारांच्या अनुभवापुढे ते डासाएवढेही नाहीत; गोटेंची जळजळीत टीका

शरद पवारांवरील वादग्रस्त विधानानंतर रोहित पवारांचा पडळकरांना 'सॉलिड' सल्ला

"जरा तोंड सांभाळून बोललं तर बरं होईल"; राष्ट्रवादीचा पडळकरांना थेट इशारा

"भाजपा आमदारांच्या अंगावर गेलात तर..."; पडळकरांच्या विधानावरून वाद चिघळला

टॅग्स :शरद पवारगोपीचंद पडळकरभाजपाराष्ट्रवादी काँग्रेसअनिल गोटेदेवेंद्र फडणवीस