'जे सोडून गेले त्यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे दरवाजे बंद'; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2023 23:29 IST2023-09-10T23:26:11+5:302023-09-10T23:29:06+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नऊ नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली, यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडल्याचे दिसत आहे.

'जे सोडून गेले त्यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे दरवाजे बंद'; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसमधील नऊ नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली, यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कासदार शरद पवार यांनी मोठं विधान केलं आहे. 'जे गेले आहेत त्यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे दरवाजे बंद झालेत, असं मोठं वक्तव्य पवार यांनी केलं आहे. हे वक्तव्य राष्ट्रवादीतून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या नेत्यांसाठी असल्याची चर्चा सुरू आहे, यामुळे आता राजकीय वर्तुळातही उलट-सुलट चर्चा सुरू आहेत.
आम्हीपण मराठ्याची औलाद, दबावाला भीक घालत नाही; अजित पवारांचे विरोधकांवर टीकास्त्र
आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीचे सर्व आमदार, खासदार आणि जिल्हाध्यक्षांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला खासदार शरद पवार यांनी संबोधित केले. महाविकास आघाडीमध्ये ज्या काही आपल्या वाटेला ७०-८० येतील त्याच्या तयारीला लागण्याचे आवाहन देखील पवार यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.
शरद पवार म्हणाले, पक्षातील काही सहकारी आता हळूच एक शंका काढतात. आता झालं ठिक आहे. आम्ही कामाला लागलो. पण, परत आल्यावर काय? ते आता परत आल्यावर डोक्यातून काढून टाका.या संदर्भात आता आपण निर्णय घेणार नाही. अशा संकटाच्या काळात जे मजबुतीने उभे राहिले, ते खरे आणि त्यांच्या पद्धतीने निवडणुकीला जावे लागेल, असंही शरद पवार म्हणाले.
G-20 च्या आमंत्रण पत्रिकेवर प्रेसिडेंट ऑफ भारत असं नाव टाकल्यानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली. यावर शरद पवार यांनी देखील आरोप केले, पवार म्हणाले, देशाचं नाव बदलण्याचा इतका अट्टाहास का? 'मग आता गेटवे ऑफ इंडिया आणि रिझर्व्ह बँकेचे देखील नाव बदला., असंही पवार म्हणाले.