“लोणावळा भुशी धरण दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची मदत”: अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 19:23 IST2024-07-03T19:22:58+5:302024-07-03T19:23:14+5:30
NCP DCM Ajit Pawar News: भविष्यात पुनरावृत्ती टाळण्यासाठी अपरिचित धोकादायक ठिकाणी सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

“लोणावळा भुशी धरण दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची मदत”: अजित पवार
NCP DCM Ajit Pawar News: लोणावळा येथील भुशी धरण धबधब्यात, पुण्याच्या हडपसर भागातील एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची घटना दुर्दैवी आहे. भुशी धरण दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या पीडितांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
विधानसभेत सदस्य चेतन तुपे यांनी पॉईंट ऑफ ऑर्डरच्या माध्यमातून भुशी धरण दुर्घटनेबाबत मुद्दा उपस्थित केला होता. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी आणि अपरिचित धोकादायक ठिकाणी जाण्यापासून नागरिकांना रोखण्यासाठी, धोक्याच्या ठिकाणी प्रतिबंधात्मक फलक लावण्यासह आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांना दिले.
जिल्हाधिकारी आणि जिल्हा नियोजन अधिकारी यांना निर्देश
भुशी धरण परिसरातील दुर्घटना दुर्दैवी असून अशा दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करण्यात येईल. या निधीतून संभाव्य धोकायदायक ठिकाणी प्रतिबंधात्मक माहिती फलक लावणे, कुंपण घालणे, सुरक्षिततेसाठी जाळ्या लावणे आदी कामे करण्यात येतील. पर्यटकांची वर्दळ असलेल्या ठिकाणी माहिती फलक लावणे, सुरक्षिततेच्या उपाययोजना करणे आदी कार्यवाही आधीपासूनच करण्यात येत आहे. तसेच दुर्गम धोकादायक स्थळी सुरक्षिततेबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आणि जिल्हा नियोजन अधिकारी यांना देण्यात येतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत बोलताना सांगितले.