राज्यातील खेड्यापाड्यांमध्ये राष्ट्रवादी पोहोचविण्याचा पवारांनी सांगितला 'मास्टर प्लान'
By मोरेश्वर येरम | Updated: December 12, 2020 18:42 IST2020-12-12T18:36:25+5:302020-12-12T18:42:53+5:30
गावागावात आधुनिकता आणि विज्ञानाच्या विचारांची पिढी निर्माण करण्याचं काम आपल्या पक्षानं करायला हवं, असं शरद पवार म्हणाले.

राज्यातील खेड्यापाड्यांमध्ये राष्ट्रवादी पोहोचविण्याचा पवारांनी सांगितला 'मास्टर प्लान'
मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज ८० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शरद पवार यांनी आपल्या भाषणात सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल आभार व्यक्त करतानाच राष्ट्रवादी काँग्रेसला गावागावात पोहोचविण्याचं कार्यकर्त्यांना आवाहन केलं.
गावागावात आधुनिकता आणि विज्ञानाच्या विचारांची पिढी निर्माण करण्याचं काम आपल्या पक्षानं करायला हवं, असं शरद पवार म्हणाले. जीवनामध्ये आपली विचारधारा केव्हाच बदलू नये. जीवनाचे जे सूत्र आपण स्वीकारले त्याच रस्त्याने अखंड चालत राहण्याचा प्रयत्न करत राहायला हवा, असंही ते आवर्जुन म्हणाले.
राज्यातील खेड्यापाड्यात राष्ट्रवादीला पोहचवण्याचा मार्ग
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राज्यातील गावागावात पोहोचविण्यासाठी फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचाराच्या दृष्टीनं काम करायला हवं, असं पवार म्हणाले. "महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच नुसता उल्लेख करुन चालणार नाही. त्यांनी दिलेल्या दृष्टीवर चालण्याचं काम आपल्याला केलं पाहिजे. महात्मा फुले खेड्यात जन्माला आले असले तरी त्यांनी आधुनिकतेचा स्वीकार केला. राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा फुलेंचा आधुनिक दृष्टीकोन स्वीकारला", असं शरद पवार म्हणाले.
महात्मा फुले यांच्या आधुनिक विचारसरणीचा किस्सा
महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबाबतचा एक किस्सा यावेळी पवार यांनी सांगितला. "भारत देश शेतीप्रधान देश आहे. शेतकरी जुनी बियाणं वापरतात. त्यांना नवीन संकरित बियाणं द्यावीत. दूधाच्या व्यवसायात प्रगतीसाठी गायींची नवी जात निर्माण करण्यासाठीही त्यांनी आग्रह केला होता. त्यांनी आधुनिकतेचा स्वीकार करुन समाजासमोर आदर्श निर्माण केला. अशाच प्रकारे आधुनिकतेचा स्वीकार करुन गावागावात कार्यकर्त्यांनी काम करायला हवं", असं पवार म्हणाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि जलसंपदा मंत्रीपद...
राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ओळखत असलो तरी त्यांनीही आधुनिकतेची कास धरली होती. याचं उदाहरण देताना शरद पवार यांनी बाबासाहेब आंबेडकरांबाबतची एक महत्वूपर्ण गोष्टी सांगितली. ते म्हणाले की, "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना लिहून देशाचा पाया रचला हे सर्वांना माहित आहेच. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्वातंत्र्यापूर्वीच्या सरकारच्या मंत्रिमंडळात जलसंपदा आणि वीज मंत्री होते हे बहुदा कुणाला माहित नसावं. देशात सुबत्ता आणि आर्थिक प्रगती करण्यासाठी पाण्याचा संचय करायला हवा. यासाठी धरणं बांधायला हवीत. त्यावर जलविद्युत प्रकल्प राबवले गेले पाहिजेत हे विचार त्यांनी प्रत्यक्षात आणले. भाक्रा नांगल धरण हे त्याचं उत्तम उदाहरण आहे."
महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना पुढे नेण्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसवर आहे. त्यादिशेने प्रत्येक कार्यकर्त्याला पुढे जावं लागेल, असं शरद पवार म्हणाले.