Join us
Daily Top 2Weekly Top 5

राजीनाम्यावरुन उद्धव ठाकरेंची राष्ट्रवादीवर टीका; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2023 10:48 IST

उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते नक्कीच आहेत. त्यांच्या शब्दाला राष्ट्रीय राजकारणात मान असला, तरी पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले, असा दावा सामना अग्रलेखातून उद्धव ठाकरेंनी केला आहे. 

चारेक दिवसांपूर्वी निवृत्तीची घोषणा करताच पक्ष बुंध्यापासून हादरला व प्रत्येक जण आता आपले कसे होणार? या चिंतेने हादरून गेला. कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी मनधरणी केली व लोकभावनेचा आदर राखून पवार यांनी राजीनामा मागे घेतला व यापुढे तेच राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा सांभाळतील. त्यामुळे गेले चार-पाच दिवस सुरू असलेल्या नाटय़ावर पडदा पडला अशा शब्दात सामना अग्रलेखातून उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीवर टीका केली आहे. 

सामना अग्रलेखातून झालेल्या टीकेवर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी काही तो अग्रलेख वाचलेला नाही. सामना किंवा सामनाचे संपादक हे सर्व लोक आम्ही एकत्रित काम करतो. एकत्रित काम करत असताना पूर्ण माहिती घेऊनच त्यावर भाष्य करणे योग्य राहील, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसेच महाविकास आघाडीत सर्वकाही ठीक आहे. काळजी करू नका, असंही शरद पवारांनी म्हटलं आहे. सोलापूरमधील एका कार्यक्रमानिमित्त शरद पवार आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

दरम्यान,  नवा अध्यक्ष कोण असावा यासाठी एक भलीमोठी कार्यकारिणी पवार यांनी नेमली. त्या कार्यकारिणीत कोण? तर ज्यांनी भाजपात जाण्याचे संधान बांधले होते त्यातलेच बरेच जण होते. पण कार्यकर्त्यांचा रेटा असा व भावना अशा तीव्र की, त्या कार्यकारिणीस पवारांचा राजीनामा नामंजूर करून ‘यापुढे तुम्ही आणि तुम्हीच', असे पवारांना सांगावे लागले व तिसऱ्या अंकाची घंटा वाजण्याआधीच पवारांनी नाटकाचा पडदा पाडला. पवार यांच्या माघारीने त्यांच्या पक्षात चैतन्य आले तसे राष्ट्रीय पातळीवरील विरोधी पक्षांच्या आघाडीसही ‘हायसं’ वाटले. पवारांना मागे फिरण्याशिवाय पर्याय नव्हता हे खरे, पण या निमित्ताने आपला पक्ष नक्की कोठे आहे व आपल्याभोवती वावरणाऱ्यांची मने नेमकी कोठे फिरत आहेत, याचा अंदाज पवारांनी घेतला आहे असं सांगत ठाकरे गटाने अजित पवारांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. 

टॅग्स :शरद पवारउद्धव ठाकरेराष्ट्रवादी काँग्रेस