राज्यात लॉकडाऊनला राष्ट्रवादीचाही विरोध, उद्योगपतींनी समाजमाध्यमांतून व्यक्त केली नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 07:16 AM2021-03-30T07:16:40+5:302021-03-30T07:17:21+5:30

राज्यातील कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवरील वाढता ताण लक्षात घेऊन राज्य सरकारकडून पुन्हा लाॅकडाऊन लागू करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

NCP also opposes lockdown in the state, industrialists expressed their displeasure through social media | राज्यात लॉकडाऊनला राष्ट्रवादीचाही विरोध, उद्योगपतींनी समाजमाध्यमांतून व्यक्त केली नाराजी

राज्यात लॉकडाऊनला राष्ट्रवादीचाही विरोध, उद्योगपतींनी समाजमाध्यमांतून व्यक्त केली नाराजी

Next

मुंबई : राज्यातील कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवरील वाढता ताण लक्षात घेऊन राज्य सरकारकडून पुन्हा लाॅकडाऊन लागू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. एप्रिलमध्ये मर्यादित काळासाठी लाॅकडाऊनची तयारी सरकारी पातळीवर सुरू असताना भाजपपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसनेही लाॅकडाऊनला आपला विरोध असल्याचे जाहीर केल्याने सरकारसमोरील अडचणी वाढल्या आहेत. शिवाय उद्योग जगतानेही कोरोना रोखण्यासाठी लाॅकडाऊन हा उपाय नसल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत रविवारी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत लाॅकडाऊनबाबत चर्चा झाली. टास्क फोर्समधील तज्ज्ञ डाॅक्टरांसह वरिष्ठ अधिकारी आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे या बैठकीला उपस्थित होते. निर्बंध पाळले जात नसतील तर लाॅकडाऊन लावण्याची चर्चा बैठकीत झाली. त्यावर कठोरपणे नियमांचे पालन होत नसेल तर लॉकडाऊन करावा लागेल, असे समजून धान्यपुरवठा, औषधे, अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सुविधा यांचे नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना दिले होते. मर्यादित काळासाठी लॉकडाऊनची कार्यपद्धती लागू करण्यासाठी मदत व  पुनर्वसन विभागाने तयार करावी, असेही निर्देश त्यांनी दिले होते. प्रशासनाकडून तशा हालचाली सुरू होत्या. ३१ मार्चला आर्थिक वर्ष संपते. सध्या सरकारी आणि खासगी आस्थापना याच कामात गुंतल्या आहेत. त्यामुळे मार्च महिना संपताच साधारण २ एप्रिलपासून लाॅकडाऊन लागू करण्याची चाचपणी प्रशासनाकडून सुरू आहे. त्याला आता खीळ बसण्याची शक्यता आहे. भाजपसोबत सत्ताधारी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसने लाॅकडाऊनला विरोध केला आहे.

...तरच मृत्युदर रोखता येईल!
राज्यातील हॉटस्पॉटमध्ये सध्या कडक निर्बंध लादल्यानंतरही रुग्णांची दैनंदिन संख्या कमी न होता वाढतच गेली आहे. संख्या वाढत असतानाही केंद्र सरकार सहकार्य करत नसल्याचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या रुग्णांची संख्या वाढत असली तरी रुग्णालयांत खाटा उपलब्ध असल्याने सध्या तेवढा ताण जाणवत नाही. मात्र बेड भरले आणि रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर आरोग्य व्यवस्थेपुढे मोठा प्रश्न निर्माण होईल. अशावेळी सध्या आटोक्यात असलेले मृत्यूचे प्रमाण वाढू शकते, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ही स्थिती उद‌्भवण्यापूर्वीच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मर्यादित काळासाठी का होईना लॉकडाऊन करावा, असा त्यांचा आग्रह आहे. येत्या दोन दिवसांत सरकारने याबाबतचा निर्णय जाहीर करावा, अशी सूचनाही काही अधिकाऱ्यांनी केली आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून खासकरून ज्या भागात कडक निर्बंध लादले आहेत तेथील आकडेवारीचा अभ्यास सुरू आहे. 

‘आरोग्य सुविधा वाढविण्यावर भर द्या’
राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने लॉकडाऊनचा विचार पुढे आला आहे. पण हा पर्याय राज्याला आणि जनतेला परवडणारा नाही. त्याऐवजी आरोग्य सुविधा वाढवण्यावर भर देण्यात यावा, अशी आग्रही भूमिका आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मांडली आहे.     - नवाब मलिक, प्रवक्ते, राष्ट्रवादी  

...ते खपवून घेणार नाही
भाजपने लाॅकडाऊनला कडवा विरोध करण्याचा इरादा जाहीर केला आहे. मातोश्रीवर बसून सर्वसामान्यांचा त्रास कसा कळणार. राज्य सरकार जनतेला एक रुपयाचाही दिलासा न देता, लाॅकडाऊन लावणार असेल तर आम्ही ते खपवून घेणार नाही.     - चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप  

येत्या दोन दिवसांत सरकारने याबाबतचा निर्णय जाहीर करावा, अशी सूचनाही काही अधिकाऱ्यांनी केली आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून खासकरून ज्या भागात कडक निर्बंध लादले आहेत तेथील आकडेवारीचा अभ्यास सुरू आहे.  

उद्धवजी, अडचण  अशी आहे, की...  
n पुन्हा लाॅकडाऊनच्या शक्यतेनंतर प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा यांनीही मुख्यमंत्री ठाकरे यांना टॅग करत भूमिका मांडली. ‘उद्धवजी, अडचण अशी 
आहे की, लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका हा गरीब, स्थलांतरित मजूर आणि लघुउद्योजकांना बसतो. 
n रुग्णालये, आरोग्याच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी आवश्यक अवधी मिळावा, यासाठी सुरुवातीचे लाॅकडाऊन होते. 
n त्यामुळे आताही मृत्युदर कमी करत आरोग्य सेवेवर लक्ष केंद्रित करू या’, असे ट्विट त्यांनी केले. केंद्र सरकारला महाराष्ट्राबाबत वेगळा विचार करावा लागणार असल्याचे त्यांनी सुचवले. 
n लसीकरणाची मोहीम अधिक व्यापक करण्यासाठी त्याचे निकष निर्धारित करण्याची परवानगी महाराष्ट्राला द्यावी तसेच जलद लसीकरणासाठी खासगी कंपन्यांना त्यात सहभागी करून घेण्याचे आवाहनही महिंद्रा यांनी केले.

Web Title: NCP also opposes lockdown in the state, industrialists expressed their displeasure through social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.