'NCB should investigate Narayan Rane's speech today'; said shiv sena leader Arjun Khotkar | 'नारायण राणेंच्या आजच्या भाषणाची एनसीबीने चौकशी केली पाहिजे'; अर्जून खोतकरांची भूमिका

'नारायण राणेंच्या आजच्या भाषणाची एनसीबीने चौकशी केली पाहिजे'; अर्जून खोतकरांची भूमिका

मुंबई: शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे राणे कुटुंबीयांवर टीका केली होती. उद्धव ठाकरेंनी नाव न घेता राणेंना बेडुकाची उपमा दिल्यानं आता भाजपाचे नेते नारायण राणे यांनी देखील शिवसेनेवर पलटवार केला आहे.

आतापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणाच्या शैलीने स्वतःची प्रतिष्ठा राखली, त्याचा काल अभाव जाणवला. निर्बुद्ध शिवराळ बरळणं म्हणजे कालचं मुख्यमंत्र्यांचं भाषण होतं, अशी टीका नारायण राणेंनी केली. तसेच कोरोनाच्या काळात घरात बसून काम करत आहे. कोणी सांगितलं तुम्हाला की वाघ आहे. पिंजऱ्यातील आहात की पिंजऱ्याबाहेरचे, असा टोला देखील नारायण राणे यांनी लगावला होता. नारायण राणेंच्या या विधानावरुन आता शिवसेना देखील आक्रमक झाली आहे.

नारायण राणे यांनी आपण काय बोलतो याचं भान ठेवलं पाहिजे. नारायण राणे ज्या संस्कृतीत वाढले त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा काय करणार? ते अशाच पद्धतीने बोलतात. संपूर्ण महाराष्ट्राला त्याची कल्पना आहे. ते आणि त्यांचे मुलं कुणाचीही लायकी काढणं, खाली पाडून बोलणं यामध्ये धन्यता मानतात, असं शिवसेनेचे नेते अर्जून खोतकर यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितले.

मुख्यमंत्र्यांना शेलक्या भाषेत, एकेरी बोलले. हे महाराष्ट्राच्या जनतेला न आवडणारं आहे. तुम्ही चुका असतील तर योग्य पद्धतीने मांडा. चुका लक्षात आणून द्या. त्यांनी कोणत्या पुराव्यांच्या आधारावर अशाप्रकारे भाषण केलं, याची एनसीबीने चौकशी केली पाहिजे, अशी भूमिका घेतली अर्जून खोतकर यांनी मांडली आहे.

नेमकं काय म्हणाले नारायण राणे-

मी शिवसेनेत ३९ वर्षे होतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मला बेडूक म्हणून नाही तर वाघ म्हणून पदं दिली. आम्ही वाघ होतो म्हणून मला मुख्यमंत्री पद दिलं होतं, असं नारायण राणे यांनी सांगितले. नारायण राणे पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. तसेच बाळासाहेबांमुळे आतापर्यंत शांत आहे. दादागिरी केलीत तर ‘मातोश्री’च्या आतलं आणि बाहेरचं सगळं बाहेर काढेन, असा इशारा देखील नारायण राणे यांनी दिला.

उद्धव ठाकरेंना जनाची नाही तर मनाची वाटली पाहिजे. मुख्यमंत्री पदाला हा माणूस लायक नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामावर बोलण्याची त्यांची लायकी नाही. काय बोलतोय हे त्यांना कळत नाही. राज्यात 16 हजार कोटींचे उद्योग आणल्याचा उल्लेख केला तो फक्त कागदावर आहे, बेकारीचा उल्लेखच नसल्याचे नारायण राणे यांनी यावेळी सांगितले.

उद्धव ठाकरेंनी केली होती टीका-

भाजपामध्ये प्रवेश केल्यापासून नारायण राणे आणि नितेश राणे सातत्याने शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत. या टीकेला उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात तितक्याच सडेतोड भाषेत प्रत्युत्तर दिले होते. राज्यात काही जणांना इंजेक्शन देणे गरजेचे असते ते आम्ही देतो. बेडके किती ही फुगले तरीही ते वाघ होत नाहीत, तुम्हाला माहिती आहे. एक बेडूक आणि त्याची दोन पोरं या पक्षातून त्या पक्षात उड्या मारतात. आपण गोष्टीत बेडकीने बैल पाहिला हे ऐकले असेल. पण या बेडकाच्या पिल्लांनी वाघ पाहिला. त्यानंतर ही पिल्ले आपल्या वडिलांकडे गेली. तेव्हा मोठ्या बेडकाने ओरडायचा प्रयत्न केला. पण त्याचा आवाज आता चिरका झालाय, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 'NCB should investigate Narayan Rane's speech today'; said shiv sena leader Arjun Khotkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.