Join us  

नक्षलहल्ला, दुष्काळी चर्चेसाठी आज मंत्रिमंडळ बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2019 4:30 AM

नक्षली हल्ला, दुष्काळी उपाययोजनांसाठी गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे.

मुंबई : गडचिरोली येथील नक्षली हल्ल्यात हुतात्मा झालेल्या पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवेदना व्यक्त केल्या. काही लोक देशातील लोकशाही खिळखिळी करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांना योग्य उत्तर दिले जाईल. जवानांचे बलिदान वाया जाऊ दिले जाणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली येथील हल्ल्याचा निषेध केला. नक्षली हल्ला, दुष्काळी उपाययोजनांसाठी गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे.

गडचिरोली येथील नक्षली हल्ल्याला उचित उत्तर दिले जाईल, असे सांगतानाच या घटनेमुळे पोलीस आणि सरकारचे मनोबल कमी होणार नाही. अधिक मनोबलाने सरकार आणि पोलीस सर्व शक्तीनिशी अशा शक्तींचा मुकाबला करू. या शक्तींचा पराभव केल्याशिवाय थांबणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी याबाबत चर्चा केली असून केंद्र सरकार सर्व प्रकारची साहाय्यता पुरविण्यास तयार असल्याचे सांगितल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान, हा नक्षली हल्ला आणिं दुष्काळी उपाययोजनांसाठी गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच निवडणूक आयोगाला पत्र पाठवून राज्यातील निवडणुका संपल्याने आचारसंहिता शिथिल करण्याची मागणी केली होती. दुष्काळी उपाययोजनांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठका, पालकमंत्र्यांचे जिल्हा दौरे, दुष्काळी कामांसाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आचारसंहिता शिथिल करणे आवश्यक आहे. २००९ सालीही अशा पद्धतीने आचारसंहिता शिथिल करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी पत्रात नमूद केले आहे. निवडणूक आयोगाने परवानगी दिल्यास पालकमंत्री दुष्काळी भागाचा दौरा करतील.राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज गडचिरोली जिल्ह्यातील नक्षली हल्ल्यात हुतात्मा झालेल्या पोलीस जवानांना श्रद्धांजली वाहिली. या भ्याड नक्षली हल्ल्याचा कठोर शब्दांत निषेध केला. तसेच महाराष्ट्र दिनाच्या संध्येला राजभवन येथील विशेष निमंत्रित आणि विविध देशांच्या राजदूतांसाठी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम आणि चहापानाचा कार्यक्रम रद्द केला. तर, महाराष्ट्र दिनानिमित्तमंत्रालय आणि विधानभवनावरील रोषणाई बंद ठेवण्यात आली. राजशिष्टाचार विभागाने सर्व निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना आपापल्या जिल्ह्यातील शासकीय इमारतींवर विद्युत रोषणाई केली असेल तर ती बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

टॅग्स :मंत्रालयनक्षलवादीदुष्काळ