Join us
Daily Top 2Weekly Top 5

Nawab Malik : 'होय, मुख्यमंत्र्यांनी माझी प्रशंसा केली, शरद पवार माझ्या पाठिशी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2021 13:38 IST

Nawab Malik : शरद पवार व पक्ष माझ्या पाठीशी; ही लढाई पूर्णत्वास नेल्याशिवाय थांबणार नाही

ठळक मुद्देमंत्री नवाब मलिक यांनी ज्यांना सध्या घेरले आहे, त्यांची चांगलीच पळापळ होत आहे, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या नेत्यांचे नाव न घेता लगावला. ‘गुड गोईंग’ या शब्दात त्यांनी नवाब मलिक यांचे कौतुक केल्याची चर्चाही माध्यमांत रंगली

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्या कामाची प्रशंसा केली आणि संपूर्ण मंत्रिमंडळ माझ्या पाठीशी असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना दिली. तसेच, माझ्या पाठिशी जसे मंत्रीमंडळ आहे, तसे पक्षप्रमुख शरद पवार पवार व राष्ट्रवाद पक्षही पाठिशी असल्याचं मलिक यांनी सांगितलं. 

मंत्री नवाब मलिक यांनी ज्यांना सध्या घेरले आहे, त्यांची चांगलीच पळापळ होत आहे, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या नेत्यांचे नाव न घेता लगावला. ‘गुड गोईंग’ या शब्दात त्यांनी नवाब मलिक यांचे कौतुक केल्याची चर्चाही माध्यमांत रंगली. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत नवाब मलिक यांच्याविषयी मुख्यमंत्र्यांनी ही टिप्पणी केली. बहुतेक मंत्र्यांनी नवाब मलिक यांचे कौतुक करून त्यांच्या मोहिमेला पाठिंबा दिला. यासंदर्भात मलिक यांना विचारणा केली असता, होय, मुख्यमंत्र्यांनी माझं कौतुक केल्याचं मलिक यांनी सांगितलं. 

दरम्यान, माझी लढाई ही अन्यायाविरोधात आहे. सध्या ही लढाई लढण्यासाठी मी एकटा पुरेसा असून ही लढाई पूर्णत्वास नेल्याशिवाय थांबणार नाही, असा स्पष्ट इशाराही मलिक यांनी दिला आहे. तसेच, भाजपवर जोरदार टीकाही केली. तुमच्याकडे चाणक्य आहे, तर आमच्याकडे तालमीतला बाप आहे, अशी जहरी टीका मलिक यांनी केली. ते परभणीत एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी परभणी जिल्ह्यातील सोनपेठ नगरपालिकेतील काँग्रेसच्या 10 नगरसेवकांनी मलिकांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला.

फडणवीसांच्या ट्विटला प्रत्युत्तर

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल ट्वीटरवर मला एका जनावराची उपमा देण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपचे नेते नेहमीच प्राण्यांची नावे देत असतात. त्यातून त्यांची काय संस्कृती आहे हे दिसून येते असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला. भाजपचे नेते माणसाला माणूस समजत नाहीत. माणसाला जनावराची उपमा देणे ही यांची संस्कृती आहे. या उपाधीमुळे आमची इज्जत जात नाही उलट भाजपची काय मानसिकता आहे हे स्पष्ट होते असेही नवाब मलिक म्हणाले.

आमच्याकडे तालमीतला बाप

भाजपकडून विधानसभा निवडणुकीत कट कारस्थान करण्यात येत होतं, शरद पवार साहेब संपले, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. काही जण तुमच्याकडे चाणक्य आहे, असं म्हणतात मात्र, आमच्याकडे तालमीतला बाप आहे. आम्ही कोणाला घाबरत नाही, आम्ही झोपतो पण आणि झोप उडवतो पण, असा इशारा नवाब मलिक यांनी दिला. नव्यानं लोक या पक्षात येतात त्यामुळे या पक्षात कोणताही नवा जुना वाद होणार नाही, याची काळजी घ्या, असंही नवाब मलिक म्हणाले.

टॅग्स :नवाब मलिकशरद पवारउद्धव ठाकरेमुख्यमंत्री