Join us

Nawab Malik: 'राष्ट्रवादीचं शिष्टमंडळ आता थेट ईडीच्या कार्यालयात जाणार आणि...'; नवाब मलिकांनी केली घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2021 17:55 IST

राज्यात वक्फ बोर्डाच्या कार्यालयांवर सक्तवसुली संचालनालयाकडून (ED)छापेमारी सुरू असल्याचं वृत्तसमोर आल्यानंतर सविस्तर माहिती देण्यासाठी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik on ED) यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं.

मुंबई- 

राज्यात वक्फ बोर्डाच्या कार्यालयांवर सक्तवसुली संचालनालयाकडून (ED)छापेमारी सुरू असल्याचं वृत्तसमोर आल्यानंतर सविस्तर माहिती देण्यासाठी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik on ED) यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. यात वक्फ बोर्डाच्या वतीनं ७ एफआयर दाखल करण्यात आल्या होत्या. उलट मीच वक्फ बोर्डात क्लीन अप मोहीम राबवली. ईडीकडून छापेमारी सुरू असेल तर त्यांचं स्वागतच आहे. वक्फ बोर्डाच्या ३० हजार संलग्नित संस्थांची चौकशी करण्याची मागणी मी करतो, असं नवाब मलिक म्हणाले. 

वक्फ बोर्डाच्या कार्यालयांवर ईडीनं छापेमारी केल्यानं आता नवाब मलिक अडचणीत येणार अशा बातम्या चालवल्या जात आहेत. पण यात काहीही तथ्य नाही. माझ्यामागे ईडी लावा नाहीतर सीबीआय लावा मी काही शांत बसणारा व्यक्ती नाही. नवाब मलिक तुरुंगाला घाबरत असेल असं जर विरोधकांना वाटत असेल तर त्यांनी आपला गैरसमज दूर करावा, असं नवाब मलिक म्हणाले. 

"ईडीनं जरुर छापेमारी आणि कारवाया कराव्यात. पण भाजपच्या ज्या नेत्यांवर ईडीने गुन्हे दाखल केले आहेत त्या केसमध्ये ईडीने काय कारवाई केली आहे याची विचारणा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शिष्टमंडळ ईडी कार्यालयात जाणार असल्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे", अशी नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि प्रमुख नेत्यांसह एक शिष्टमंडळ ईडीच्या कार्यालयात जाणार असल्याचं मलिकांनी सांगितलं. 

भाजपच्या अनेक नेत्यांवर ईडीने कारवाई केली होती मात्र त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यावर त्यांच्यावरील कारवाई थांबवण्यात आली होती. या सर्व प्रकरणाची माहिती राष्ट्रवादीकडून संकलित करण्यात आली असल्याचे सांगतानाच संपूर्ण यादी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे मंत्री, नेते वेळ घेऊन ईडीच्या कार्यालयात जाऊन भाजप नेत्यांवरील कारवाईला गती का देत नाही, हे तपास का थांबले आहेत याची माहिती घेणार आहोत, असेही नवाब मलिक यांनी सांगितले. ईडीला सहकार्य करण्यासाठी सगळी माहिती गोळा झाली आहे ज्यांच्यावर तक्रारी दाखल आहेत त्या गतीमान करा असे आवाहनही ईडी अधिकार्‍यांना करणार असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

टॅग्स :नवाब मलिकराष्ट्रवादी काँग्रेसनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोअंमलबजावणी संचालनालय