नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 11:03 IST2025-08-15T11:03:50+5:302025-08-15T11:03:50+5:30
NCP Nawab Malik News: महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसला कोणत्याही परिस्थितीत जिंकून आणण्यासाठी नवाब मलिक अॅक्शन मोडवर येत पहिलीच बैठक घेतली.

नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
NCP Nawab Malik News: आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसने माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांच्यावर मुंबई निवडणूक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसची मुलुखमैदान तोफ अशी ओळख असलेले आणि मुंबई अध्यक्ष राहिलेले नवाब मलिक यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी सोपवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदाचा समीर भुजबळ यांनी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राजीनामा दिला होता. तेव्हापासून मुंबई अध्यक्षपद रिक्त आहे. राष्ट्रवादीने मुंबई अध्यक्ष न नेमता समिती नेमली आहे.
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अॅक्शन मोडवर
राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबई महानगरपालिका निवडणूक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदाची धुरा हाती सोपवल्यावर नवाब मलिक अॅक्शन मोडवर आले असून व्यवस्थापन समितीची पहिलीच बैठक आज सायंकाळी एमआयजी क्लब बांद्रा येथे पार पडली. आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीच्यादृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी मुंबईची जबाबदारी ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्यावर मंगळवारी सोपवली आणि एक दिवस संपताच मुंबई महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसला कोणत्याही परिस्थितीत जिंकून आणण्यासाठी नवाब मलिक अॅक्शन मोडवर येत पहिलीच बैठक घेतली.
दरम्यान, या बैठकीला नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली मुंबई कार्याध्यक्ष सिध्दार्थ कांबळे, शिवाजीराव नलावडे, आमदार सना मलिक - शेख, माजी आमदार झिशान सिद्दीकी, प्रदेश सरचिटणीस संतोष धुवाळी, प्रदेश उपाध्यक्ष भास्कर विचारे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, निमंत्रित सदस्य दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे, उत्तर-पश्चिम जिल्हाध्यक्ष अजय विचारे, उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष इंद्रपाल सिंग, ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष सुरेश भालेराव, मुंबई सरचिटणीस राजू घुगे आदी उपस्थित होते.