"नवाब मलिक यांनी ड्रग्स माफियांकडून जणू सुपारीच घेतलीय; ...मुख्यमंत्री महोदय, आपण गप्प का?"
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2021 19:29 IST2021-10-26T19:27:51+5:302021-10-26T19:29:20+5:30
मंत्री नवाब मलिक करीत असलेल्या ‘लाय ट्रायलच्या’ निषेधार्थ व समीर वानखेडे करीत असलेल्या अंमली पदार्थ विरोधी कारवाईला पाठिंबा दर्शविण्यासाठी आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या वतीने कांदिवली येथे स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.

"नवाब मलिक यांनी ड्रग्स माफियांकडून जणू सुपारीच घेतलीय; ...मुख्यमंत्री महोदय, आपण गप्प का?"
मुंबई - केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी दलाचे वरिष्ठ अधिकारी समीर वानखेडे यांनी गेल्या वर्षी मुंबईसह महाराष्ट्रात ड्रग्स व अंमली पदार्थ विरोधी कारवाया केल्या. एवढेच नाही, तर खुद्द नवाब मलिक यांच्या जावयाला अंमली पदार्थ तस्करीत ८ महिने तुरुंगवास भोगावा लागला. यामुळे पोटशुळ उठलेल्या ठाकरे सरकारचे मंत्री नवाब मलिक हे प्रामाणिक हिंदू-मराठी अधिकारी असलेल्या समीर वानखेडे यांच्या खाजगी आयुष्यावर अतिशय खालच्या पातळीवर जात खोटे आरोप करत आहेत. त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचे षड्यंत्र रचत असतानाच कायम हिंदू व मराठी विषयी पुळका असल्याचे दाखवणारे मुख्यमंत्री महोदय, आपण गप्प का? असा थेट सवाल मुंबई भाजप प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.
मंत्री नवाब मलिक करीत असलेल्या ‘लाय ट्रायलच्या’ निषेधार्थ व समीर वानखेडे करीत असलेल्या अंमली पदार्थ विरोधी कारवाईला पाठिंबा दर्शविण्यासाठी आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या वतीने कांदिवली येथे स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी दलाकडून मुंबईसह राज्यात अंमली पदार्थ तस्करीचे दिवसागणिक रॅकेट उघड केले जात असताना व वर्षभराच्या काळात १७ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे अंमली पदार्थ व ३०० पेक्षा जास्त ड्रग्स माफियांवर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना समर्थन देण्याचे सोडून महाविकास आघाडी सरकारचे मंत्री मात्र अधिकाऱ्यांना धमक्या देण्यात, त्यांच्या खाजगी आयुष्याविषयी खोटे दावे करत त्यांच्यावर दबाव निर्माण करण्याचा बेशरमपणा करत आहेत. महाराष्ट्र अंमली पदार्थ विरोधी दलाला सक्त आदेश देत राज्यातील अंमली पदार्थ तस्करीची पाळेमुळे उखडून टाकण्याचे काम करणे सोडून केंद्रीय पथकाच्या अधिकाऱ्यांवरच पाळत ठेवण्याचे काम मुंबई पोलिसांना देण्यात आले आहे.
यातून महाविकास आघाडी सरकार ड्रग्स माफियांना पाठीशी घालत असून मंत्री नवाब मलिक यांनी तर ड्रग्स माफियांकडून जणू सुपारी घेतली असल्याचे स्पष्ट दिसत असल्याची टीकासुद्धा आमदार भातखळकर यांनी यावेळी केली.