Join us  

नवाब मलिक पुन्हा सत्ताधाऱ्यांच्या बाकावर; मराठा आरक्षणाच्या विशेष अधिवेशनाला हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 4:00 PM

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते नबाव मलिक यांच्यावर आरोप आहेत.

मुंबई - राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण १० टक्के आरक्षण देण्यासंदर्भातील विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाज हा मागास असल्याचे सांगत मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे सभागृहात विधेयक मांडलं होतं. या विधेयकाला सर्वपक्षीय आमदारांनी पाठिंबा दिला असून एकमताने हे विधेयक मंजूरही करण्यात आलं. या विधेयकासाठी सरकारने विशेष अधिवेशन बोलावले होते. त्यामुळे, सर्वच राजकीय पक्षाचे आमदार सभागृहात उपस्थित होते. यावेळी, सध्या जामीनावर असलेले आमदार  नवाब मलिक हेही उपस्थित होते. 

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते नबाव मलिक यांच्यावर आरोप आहेत. या प्रकरणी त्यांना अटक झाली होती, त्यानंतर १ वर्षे आणि ५ महिन्यांचा तुरुंगावास भोगल्यानंतर त्यांना न्यायालयातून जामीन मिळाला होता. प्रकृतीच्या कारणास्तव मलिक यांना सुरुवातीला ११ ऑगस्ट रोजी २ महिन्यांसाठी जामीन मिळाला होता. त्यानंतर या जामिनाला ऑक्टोबर महिन्यात ३ महिने मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे ते आजच्या विशेष अधिवेशनाला सभागृहात उपस्थित राहिले होते. यावेळी, त्यांनी सत्ताधारी गटाच्या बाकावर उपस्थिती दर्शवल्याने पुन्हा एकदा त्यांची चर्चा होत आहे. कारण, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र लिहून नवाब मलिक यांना महायुतीत घेता येणार नाही, असे म्हटले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यामुळे नवाब मलिक तुरुंगाबाहेर आल्यानंतर ते कुठल्या गटात जाणार याची चर्चा होत होती. कारण, राष्ट्रवादीतील दोन्ही गटाच्या नेत्यांनी त्यांची भेट घेतली होती. पण, विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात ते सत्ताधारी गटाच्या बाकावर बसले होते. त्यामुळे, नवाब मलिक हे अजित पवार गटासोबत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यानंतर, आज पुन्हा एकदा मराठा आरक्षणासंदर्भातील विशेष अधिवेशनासाठी त्यांनी सभागृहात हजेरी लावली. यावेळी, आजही ते सत्ताधारी गटाच्या बाकावर बसल्याचे दिसून आले. त्यामुळे, मलिक यांनी अजित पवारांचे नेतृत्त्व मान्य केल्याचं बोललं जात आहे.

नवाब मलिक कोणत्या गटात? 

नवाब मलिक हिवाळी अधिवेशनावेळी सभागृह परिसरात दाखल झाले. यावेळी त्यांनी शरद पवार गटाच्या नेत्यांची भेट घेतली. तर, अनिल देशमुख यांची गळाभेट घेतली होती. शरद पवार गटाच्या नेत्यांना भेटल्यानंतर नवाब मलिक थेट अजित पवार गटाचे नेते अनिल पाटील यांच्याही कार्यालयात गेले. तत्पूर्वी, राष्ट्रवादीतील दोन्ही गटाच्या नेत्यांनी मलिक यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. स्वत: अजित पवार यांनीही मलिक यांची भेट घेतली होती. त्यात, आज विधानसभेत ते सत्ताधारी बाकावार बसल्याचं दिसून आलं. त्यामुळे, मलिक यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, ते कोणत्या गटात हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीतच आहे.   

टॅग्स :मराठा आरक्षणनवाब मलिकमुंबईराष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार