माटुंग्याच्या ग्रामदेवतेची तीन शतकांची परंपरा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2019 23:29 IST2019-09-28T23:29:01+5:302019-09-28T23:29:30+5:30
ज्या वेळी मुंबई सात बेटांमध्ये विभागली गेली होती; तेव्हा तुर्भे, माहिम व शिवडी या परिसरात एक टेकडी होती. ही टेकडी ‘मरुबाई टेकडी गाव’ या नावाने ओळखली जात होती.

माटुंग्याच्या ग्रामदेवतेची तीन शतकांची परंपरा!
- राज चिंचणकर
मुंबई : ज्या वेळी मुंबई सात बेटांमध्ये विभागली गेली होती; तेव्हा तुर्भे, माहिम व शिवडी या परिसरात एक टेकडी होती. ही टेकडी ‘मरुबाई टेकडी गाव’ या नावाने ओळखली जात होती. त्या वेळी मुंबईत आगरी, कोळी व भंडारी समाज मोठ्या प्रमाणावर होता. माटुंगा बेटावरही कोळी व आगरी समाज वास्तव्यास होता़ तेव्हापासून येथे मरुबाईचे स्थान असल्याचे सांगण्यात येते. मरुबाईबद्दल तब्बल ३०० वर्षांचा इतिहास सांगितला जातो. मरुबाईच्या नावावरूनच या परिसराला ‘माटुंगा’ हे नाव प्राप्त झाले. माटुंग्याची आद्य ग्रामदेवता असल्यानेच या देवीला ‘मरुबाई गावदेवी’ या नावाने ओळखले जाते.
सन १८८८ मध्ये मुंबईचा विकास करताना ब्रिटिशांनी मरुबाई टेकडीचा भूभाग ताब्यात घेतला, तेव्हा २८८ वार इतक्या क्षेत्रफळाचा भाग मरुबाई मंदिरासाठी मोकळा ठेवण्यात आला. याच जागेवर मरुबाईच्या मूळ मूर्तीची स्थापना करण्यात आली. मरुबाईचे मूळ स्थान सध्याच्या मंदिरापासून जवळच असलेल्या जैन मंदिराजवळ होते. परंतु आताचे मरुबाई गावदेवी मंदिर माटुंगा पूर्वेकडील नाथालाल पारेख मार्गावर आहे.